सातारा शहराचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल; तसेच जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जिहे-कटापूर योजना लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व सातार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.
भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस गृहरक्षक दलाची मानवंदना स्वीकारून उपस्थित स्वातंत्र्यसनिक व लोक प्रतिननिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष माणिक सोनवलकर, आ.आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच मान्यवर उपस्थित होते.
प्रलंबित जिहे-कटापूर योजना पूर्ण करण्याचा संकल्प या पूर्वीच्या सरकारने १९९७ मध्ये केला होता. त्याचा उल्लेख करून त्याच्या प्रगतीबद्दल माहिती दिली व ही योजना लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या बाबत शासनाकडे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जनधन योजना तसेच विमा योजनेचा उल्लेख करून त्या बाबत मिळणाऱ्या लाभासंदर्भात माहिती देऊन ते पुढे म्हणाले, या संकल्पामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात खाती उघडली आणि त्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे. ही क्रांतिकारी घटना आहे. पुणे सातारा महामार्गाचे सहा पदरीकरण करण्याचे काम हे राष्ट्रीय महामार्गाचे काम असले, तरी त्यात लक्ष घालून ते चांगले व जलद होण्यासाठी प्रयत्न आपण करत आहे. ते पुढे म्हणाले, रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास जाईल असे अपेक्षित आहे. सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आपण प्रयत्नशील असून पुढील पिढीला जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
म्हैसाळ, ताकारी, टेंभू अशा प्रकारच्या मोठय़ा उपसा सिंचन योजना बंद पडू नयेत म्हणून त्याची देखभाल दुरुस्ती व वीज बिल याची जबाबदारी सरकारने उचलावी असा प्रस्ताव असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. पुढच्या काही दिवसात यश येईल अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे प्रभावी काम झाल्याने बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाई जाणवली नाही. या अभियानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होण्याबरोबर पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. माण, खटाव, फलटण या भागातील परिस्थिती चिंताग्रस्त असली, तरी राज्यातील अन्य भागाच्या तुलनेत जिल्ह्यातील धरणांची परिस्थिती चांगली असल्याने येथील परिस्थिती बरी आहे. काटेकोर पद्धतीने पाणी वापरण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. शेतकऱ्यांनीही तशीच तत्परता दाखवली तर दुष्काळाचे संकट दूर करता येईल.
या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात ऊल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर िशदेवाडी येथे जलयुक्त शिवाराच्या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या कामांचा जलपूजन समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या बरोबर जनतेचा सहभाग या मुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाचे काम प्रशंसनीय ठरले आहे. या कार्यक्रमास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader