साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो असलो तरी पाय जमिनीवरच आहेत. म्हणूनच यापुढे खूप लिहायचे आहे. नव्यानेच पुन्हा एकदा कविता लिहायला लागलो आहे. हे आयुष्यातले चांगले वळण आहे. कवितेच्या निमित्ताने पुन्हा माणसात आलो आहे, असे मत चिपळूण येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. मराठवाडय़ातील भूमिपुत्राचा सत्कार ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, प्रा. विश्वास वसेकर, कुंडलित अतकरे, मधुकरअण्णा मुळे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कोत्तापल्ले म्हणाले, ‘जे लिहिले ते भूमिका घेऊन. लेखकाला भूमिका असायलाच हवी. जे दिसतं ते सांगण्यासाठी लेखकाची गरज नसते. त्यातून तुम्ही कोणती मूल्ये मांडता हे पाहणे महत्त्वाचे. नेहमीच व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिलो. त्यामुळे काही शत्रूही निर्माण झाले. पण शत्रूपेक्षा मित्रच अधिक होते. भूमिका नसलेला लेखक म्हणजे पाठीला कणा नसलेला माणूस. ग्रामीण साहित्याची चळवळ ही भूमिको घेऊनच चालविली. नेतृत्वासाठी चळवळ उभी राहत नाही. चळवळीचे बीज भूमितच उभे राहते.’
१९७२ नंतर शेतकऱ्यांचे निर्माण झालेले प्रश्न विदारक होते. लिहिले नसते तर अपराधीपण वाटले असते. शोषित आणि वंचितांच्या बरोबर असले पाहिजे. त्यांचा शब्द झाले पाहिजे. या भूमिकेतूनच ग्रामीण साहित्याची चळवळही उभी राहिली. तेव्हा भोवतालची परिस्थितीही तशीच होती. तेव्हा दिसलेले दु:ख शब्दातून मांडले गेले. त्यात कलात्मकता आहे की नाही, माहीत नाही. आजकाल आपल्याकडे लिहिल्यानंतर ते कलात्मक आहे की नाही असे तपासायची पद्धत आहे, अशी त्यांनी मारलेली कोपरखळी कार्यक्रमात हशा पिकवून गेली. मराठवाडय़ातील या सत्काराने भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराच्या निमित्ताने नागनाथ कोत्तापल्ले यांच्या साहित्यावर प्राध्यापक विश्वास वसेकर यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, नाटक वगळता कोत्तापल्ले यांनी सर्व वाङ्मय प्रकार हाताळले. कथा, कविता, समीक्षा या सर्व प्रांतात त्यांचे साहित्य तुल्यबळ आहे. पण त्यांची कथा कसदार आहे. गेल्या काही वर्षांत कथा वाङ्मय प्रकाराला वाईट दिवस होते.
भालचंद्र नेमाडे यांनी या कलाप्रकाराला हिंस्र पद्धतीने हिणविले. ती शैली स्वत:ची वकिली करणारी होती. कधीतरी त्यांच्या हयातीतच कथा हा वाङ्मयीन प्रकार कांदबरीपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे निश्चितपणे मांडेन, असे सांगत वसेकर यांनी कोत्तापल्ले यांच्या ‘कर्फ्यू’ या कथेचे उदाहरण दिले. कोत्तापल्ले यांच्या कथेचा अर्थवलय घाट व त्याचे संतुलन उंचीचे आहे. त्यात विश्व वात्सल्य दडलेले आहे. त्यामुळे पुढच्या काळात मराठी भाषेतील नोबेल कोत्तापल्ले सरांना मिळू शकते, असेही वसेकर म्हणाले. यावेळी भास्कर चंदनशिव यांनी कोत्तापल्ले यांची माणूस म्हणून असणारी बांधिलकी सांगितली. हा निर्मळ मनाचा माणूस आहे म्हणूनच मूल्यांची पाठराखण त्यांच्याकडून होऊ शक ते, असे चंदनशिव म्हणाले. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कोत्तापल्ले यांच्याकडून चांगलेच काम होईल, असे ना. धों. महानोर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा गोरे यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप कौतिकराव ठाले यांनी केला.
नव्याने कविता लिहू लागलोय; माणसात आलोय -कोत्तापल्ले
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो असलो तरी पाय जमिनीवरच आहेत. म्हणूनच यापुढे खूप लिहायचे आहे. नव्यानेच पुन्हा एकदा कविता लिहायला लागलो आहे. हे आयुष्यातले चांगले वळण आहे. कवितेच्या निमित्ताने पुन्हा माणसात आलो आहे, असे मत चिपळूण येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा
First published on: 17-12-2012 at 01:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start writing new poem