राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी गृह विभागाने जारी केले.
राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका खुल्या व स्वच्छ वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यादृष्टीने ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आज गृहविभागाने जारी केले. ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना अन्यत्र पाठविण्यात आले आहे.
किनवटचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्यासह मराठवाडय़ातील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना या विभागात केवळ आठजणांना नियुक्ती देण्यात आली. औरंगाबादचे अशोक सोनवणे यांची जळगाव येथे, खुशाल िशदे यांची ठाणे, जालन्याचे रवींद्र पेरगुलवार यांची बीड येथे, तर विजयकुमार ठक्करुवार यांची नाशिक येथे बदली करण्यात आली. नांदेडचे उत्तम मुळूक व नंदकिशोर शेळके यांची अनुक्रमे नागपूर व अमरावती येथे बदली झाली. िहगोलीचे रवींद्र गायकवाड यांची नागपूर येथे, तर बीडचे दिनकर डंबाळे, शशिकांत डोके व हनुमंत गायकवाड यांची अनुक्रमे उस्मानाबाद, अहमदनगर व यवतमाळ येथे बदली करण्यात आली. नाशिकचे भगिरथ देशमुख, रामभालसिंग, नंदूरबारचे विजय जाधव, बुलढाण्याचे कुंडलिक ताठे, यवतमाळचे विजय सोनवणे, नागपूरचे संजय जोगदंड, गजानन कंकाळे हे अधिकारी मराठवाडय़ाच्या वेगवेगळ्या भागात येणार आहेत.
बदल्यांच्या आदेशात पोलीस महासंचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे निर्देश दिले आहेत. मोठय़ा प्रमाणात बदल्या होतील, अशी शक्यता होती. पण केवळ ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आगामी काळात आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील, असे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा