महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) आपला मेकओव्हर केला असून पक्षाच्या अजेंड्याबरोबरच झेंडाही बदलला आहे. पक्षाच्या नव्या भगव्या झेंड्यावर मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारातील राजमुद्रेची प्रतिमा वापरली आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला पत्र पाठवून पक्ष स्तरावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य निवडणूक आयोगाने मनसेला पत्र लिहून त्यामध्ये त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींबाबत माहिती दिली आहे. तसेच याबाबत पक्ष स्तरावर कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. संभाजी ब्रिगेड, जय हो फाऊंडेशन आणि मराठा महासंघाने याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तीन स्वतंत्र तक्रारींनुसार, मनसेनं आपल्या राजकीय हितासाठी पक्षाच्या ध्वजात बदल करुन त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला. यामुळे थोर व्यक्ती आणि चिन्हांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, मनसेनं आपल्या नव्या झेंड्यावर छापलेली स्वराज्याच्या राजमुद्रेची प्रतिमा त्वरीत हटवावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच जर मनसेनं ही राजमुद्रेची प्रतिमा हटवली नाही तर संभाजी ब्रिगेड मनसेविरोधात आपल्या स्टाईलनं रस्त्यावर उतरेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State ec gives notice to mns on a complaint filed against new flag which bears chhatrapati shivajis insignia aau