स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमधील भाषा व गणितातील अध्ययन अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यातील ३ हजार ५०० शाळांमध्ये ‘वाचन, लेखन आणि गणित विकास कार्यक्रम’ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि प्रथम एज्युकेशन फौंडेशन (प्रथम) मार्फत राबवला जाणार आहे.
मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ातील, प्रत्येकी एका तालुक्यातील १०० शाळांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. नगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यातील १०० शाळांचा त्यात समावेश आहे. परिषद व प्रथम यांच्या कोअर समितीने विकसित केलेले साहित्य जिल्हा स्तरावर पोचले असून, केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. प्रत्येक तालुक्यातील समन्वयासाठी परिषदेच्या ३ व ‘प्रथम’ संस्थेच्या २ अशा एकूण ५ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गाचा अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठीचा निधी सर्व शिक्षा अभियानमधून खर्च केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता विकासासाठी काम करणाऱ्या परिषद काम करते. या कार्यक्रमात इयत्तावार भाषा व गणिताची कोणती मूलभूत कौशल्ये अवगत करावीत याची मांडणी परिषदेने केली आहे.
‘प्रथम एज्युकेशन फौंडेशन’ संस्था गेल्या सुमारे वीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व मुलभूत गणित शिकण्यास मदत केली तर मुले कौशल्ये आपणहून शिकतात हे संस्थेने ‘रिड इंडिया’ मोहिमेद्वारे पडताळून पाहिले आहे. तसेच संस्था दरवर्षी ‘असर’ (अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) या पाहणी, अहवालाद्वारे वरील कौशल्ये किती प्रमाणात मुलांनी आत्मसात केली याकडे लक्ष वेधते.
डिसेंबर २०१३ ते मार्च २०१४ दरम्यान हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक वर्गाचे अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. अंतिम चाचणी घेऊन फलनिष्पत्ती तपासली जाणार आहे व त्या निष्कर्षांच्या आधारावर पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवली जाणार आहे. सध्या प्रशिक्षण घेतलेले केंद्रप्रमुख पुढील आठवडय़ात शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत व त्यानंतर पूर्व चाचणी होणार असल्याची माहिती शिक्षण विभाग व प्रथम संस्थेकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State educational research council sets to clear the backlog of language maths