Maharashtra Petrol Diesel Price Today : राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात (Petrol and Diesel Price) करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांंनी केली आहे. राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी विकासकामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली.

राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार

“केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ व २२ मे २०२२ रोजी पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यांनी राज्य शासनालादेखील कर कमी करण्याचे आवाहन केले होते. काही राज्यांनी केंद्राच्या सूचना मान्य करुन इंधनाचे दर कमी केले होते. मात्र आपल्या राज्यात इंधनाचे दर कमी करण्यात आले नव्हते. आपल्या युतीच्या सरकारने ठरवलं आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळे आजपासून पेट्रोलचे पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी दरकपातीचा निर्णय जाहीर करताना सांगितले.

पाहा व्हिडीओ –

याआधी दिले होते संकेत

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी इंधन दरकपात करण्याचे संकेत दिले होते. येणाऱ्या काळात लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करु, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज ही इंधन दरकपातीची घोषणा करण्यात आली.

काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ

रशिया-युक्रेन युद्धामुळे समस्त जगाला इंधन दरवाढीला सामोरे जावे लागले. भारतातही त्याची झळ बसली असून मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने इंधनावरील करपात केली होती. तसेच राज्यांनादेखील कर कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने इंधनाचे दर कमी केले नव्हते. त्यानंतर आता सत्ताबदल झाल्यामुळे राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला.