बारामतीमध्ये सरकारतर्फे ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. २ आणि ३ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण मिळाले नसल्याची बातमी आज दिवसभर सुरू होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पुणे कार्यालयात सदर निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली. मात्र शरद पवार यांना अद्यापही निमंत्रण दिलेले नाही. सुप्रिया सुळे यांनी निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यामध्ये त्यांचे नावही समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचे दिसले. शरद पवार आणि बारामती असे समीकरणच आजवर दिसत होते. देशाचे अनेक माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान हे बारामती येथे येऊन गेले आहेत. कोणताही शासकीय कार्यक्रम असला तरी शरद पवार त्याचा भाग असतात. मात्र पहिल्यांदाच त्यांना एखाद्या शासकीय कार्यक्रमातून वगळण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती

शरद पवार ज्या विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्याच संस्थेच्या मैदानात सदर मेळावा संपन्न होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही शरद पवार यांना निमंत्रण दिलेले नाही, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी विधान भवनात माध्यमांशी बोलताना दिली. तर निमंत्रण मिळण्यापूर्वी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, “मला निमंत्रण मिळाले नाही तरी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला उपस्थित राहणार.”

खासदार वंदना चव्हाण यांना निमंत्रण, पण पवारांना वगळलं

विशेष म्हणजे निमंत्रण पत्रिकेवर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. पण बारामतीचे असलेले आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचा नामोल्लेख टाळला गेला आहे. “२०१५ च्या शासन निर्णयानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांसाठी स्थानिक आमदार, खासदार (दोन्ही सभागृह) यांना निमंत्रित केले जावे, असा नियम करण्यात आला आहे. तरीही या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच राजशिष्टाचाराचा कोणताही नियम या कार्यक्रमासाठी पाळला गेला नाही”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

शरद पवारांच्या संस्थेत कार्यक्रम याचा आनंद

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, शरद पवार यांनी स्थापन केलेल्या आणि आजही तेच अध्यक्ष असेलल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेत हा कार्यक्रम होत आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. पण शरद पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण का दिले नाही? याचे उत्तर सरकारच देऊ शकते.

शरद पवार प्रेक्षकांमध्ये बसणार?

आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माध्यमांशी बोलत असताना सांगितले की, शरद पवारांना निमंत्रण मिळाले नसले तरी ते बारामतीकर म्हणून प्रेक्षकांमध्ये बसून हा कार्यक्रम पाहण्यासाठी तयार आहेत. तसेच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना गोविंदबागेतील घरी जेवणाचे निमंत्रणही दिले आहे. तसेच माझ्या संस्थेत येत आहात तर गेस्ट हाऊसवर चहासाठी या, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यांची ही कृती शिष्टाचार नाकारणाऱ्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.