हवामानातील बदल आणि कीडरोगामुळे कोकणातील आंबापिकाचे गेल्या वर्षी नुकसान झाले होते. हे नुकसान लक्षात घेऊन आंबाबागायतदारांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याअंतर्गत रायगड जिल्ह्य़ासाठी ४ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्याचे तालुका स्तरावर वितरण केले जाणार आहे.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्य़ांत ९९ हजार १७२ हेक्टर आंब्याचे उत्पादनक्षम क्षेत्र आहे. त्यापैकी ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर गेल्या वर्षी फुलकिडय़ांचा प्रादुर्भाव झाला होता. फुलकिडे आणि वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा पिकाचे नुकसान झाले होते. अशा आंबाबागायतदारांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन १२-१३च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले होते. या प्रस्तावाला राज्य सरकारने गेल्या डिसेंबर महिन्यात प्रशासकीय मान्यता दिली होती. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर आता कोकणातील चार जिल्ह्य़ांसाठी ७४ कोटींची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील ३५ कोटींचा निधी कोकणातील चार जिल्ह्य़ांना प्राप्त झाला आहे. रायगड जिल्ह्य़ासाठी ४ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणून आंबा उत्पादनात ५० टक्केपेक्षा अधिक घट असणाऱ्या उत्पादनक्षम क्षेत्राच्या ६० टक्के भागासाठी प्रती हेक्टरी १५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित केले जाणार आहे. तालुकास्तरावर या निधीचे वितरण करण्यात येणार असून, बागायतदारांच्या बँकांमधील खात्यात ही रक्कम थेट वितरित केली जाणार आहे. सहा वर्षांवरील उत्पादनक्षम तसेच सातबारावर नोंद असणाऱ्या झाडांसाठीच ही मदत मिळणार आहे.  रायगड जिल्ह्य़ातील १४ हजार हेक्टरवरील २२ हजार आंबा बागायतदारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. तालुकास्तरावर निधीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. तरी बाधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.