गेल्या २-३ वर्षांपासून बीडसह मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागत असून पैसेवारीच्या नियमांत बदल करून मराठवाडय़ात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे केली. एक वर्ष उलटूनही पोलिसांना डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे आरोपी सापडत नाहीत आणि सापडणार तरी कसे? कारण सरकारच दाभोलकरांचे मारेकरी आहे, असा गंभीर आरोप आठवले यांनी या वेळी केला.
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या साठी बुधवारी रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आठवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राजाभाऊ सरवदे आदींची उपस्थिती होती. आठवले म्हणाले की, राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठवाडय़ावर सातत्याने अन्याय केला. मराठवाडय़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सरकारने केवळ टंचाईग्रस्त तालुक्यांची नावे जाहीर केली आहेत. यातूनही अनेक तालुक्यांना वगळले आहे. पाऊस कमी असतानाही सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू केले. परंतु टँकर गावात पोहोचेपर्यंत अध्रे रिकामे होतात. एकही योजना योग्य हाताळली जात नसल्याचा आरोप आठवले यांनी केला.
आदिवासींवर अन्याय न होता धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारभाराचेही आठवले यांनी वाभाडे काढले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना आठवले म्हणाले की, मुंडेंच्या अकाली जाण्याने बीडसह राज्याचे व देशाचे मोठे नुकसान झाले. मुंडेंच्या वारसदार म्हणून आमदार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चात जिल्हाभरातील भीमसनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
रिपाइंला २० जागा हव्यात
रिपाइंची साथ असल्याशिवाय राज्यात सत्तापरिवर्तन अशक्य आहे. रिपाइंला झुकते माप द्यावेच लागेल, असे सांगून महायुतीकडे रिपाइंने २० जागांची मागणी केली आहे. यात बीडमधील केज मतदारसंघाचाही समावेश आहे. महायुतीने जागावाटप निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणीही आठवले यांनी केली.

Story img Loader