संदीप आचार्य
मुंबईसह राज्यात करोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने रुग्णोपचारासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य तज्ञांच्या अंदाजानुसार तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेच्या किमान दीडपट रुग्णवाढ होणार असून त्यानुसार पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. या सूचनांचा विचार करून रुग्णखाटा, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन खाटांच्या व्यवस्थेपासून ते सक्रिय रुग्णसंख्या ज्या जिल्ह्यात जास्त आहे तेथे दोन ते तीन महिने पुरेल एवढा औषध साठा करून ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उर्वरित ३५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल व त्यापैकी १७.५ टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयात तर १७.५ टक्के रुग्ण हे शासकीय व पालिका रुग्णालयात दाखल होतील हे लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील एकूण उपलब्ध खाटांपैकी आठ टक्के खाटा या डीसीएच म्हणजे समर्पित करोना रुग्णांसाठी राखीव असतील. तर या आठ टक्के खाटांमध्ये ३२ टक्के हे ऑक्सिजन खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय २४ टक्के ऑक्सिजन खाटा या समर्पित करोना आरोग्य केंद्रात (डीसीएचसी), उर्वरित ६० टक्के खाटा या डीसीएचमध्ये सर्वसाधारण खाटा असतील तर दहा टक्के खाटा या डीसीएचसीमध्ये राखीव असतील. या शिवाय समर्पित करोना काळजी केंद्रात ५० टक्के खाटा ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यातील ६७२६ आरोग्य संस्थांमध्ये एकूण ४ लाख ६६ हजार ४५१ विलगीकरणाअंतर्गत खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर एक लाख २१ हजार ३३८ ऑक्सिजन खाटा तसेच अतिदक्षता विभागातील ३५,५५५ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच १३,८४४ व्हेंटिलेटर खाटा राखीव ठेवण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन ११३ रुग्णालयांमध्ये २६,७२० खाटा असून ९०५० ऑक्सिजन खाटा तर नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभागात ११६० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय बालकांसाठी २३३५ आयसीयूत खाटा ठेवण्यात आल्या असून ११८८ व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. याचबरोबर सर्वेक्षण वाढवणे, चाचण्या वाढवणे तसेच विमानतळावरील तपासणी व्यवस्था याचाही आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

Covid 19 : “अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, तो आज उद्यामध्येच घ्यावा लागेल” ; आरोग्यमंत्री टोपेंचं विधान

जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाला गती देण्याबरोबरच जिनोमिक प्रयोगशाळा तपासणीसाठी सहा संस्था कार्यरत आहेत. काही निर्बंध नव्याने लागू केले जातील. तसेच नवीन व्हेरीयंटचा अभ्यास करून लोकांपर्यंत योग्य ती माहिती दिली जाणार आहे. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी ५४८ पीएसए टँक मंजूर करण्यात आले असून त्यापैकी १२१ टँकचे काम पूर्ण झाले आहे. १७,८६९ जम्बो सिलिंडर्स, १६,६५३ बी टार्ईप सिलिंडर तसेच ४२४ डुरा सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मंत्रालयातही ओमायक्रॉनचा शिरकाव; दोन पोलीस आणि एक कर्मचारी बाधित!

करोनाविषयक वेगवेगळ्या चाचण्यांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाचण्यांपासून मास्कच्या किमतीपर्यंत बहुतेक गोष्टींच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम आरोग्य विभागाने केले आहे. राज्य हेल्पलाईन पासून करोना वॉर रुम उभारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील बहुतेक रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईन तयार करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन टँकच्या व्यवस्थेसह रुग्णांसाठी ऑक्सिजन वापराचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. या काळात होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली असून बहुतेक जिल्ह्यात दोन ते तीन महिन्यांचा औषध साठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

Story img Loader