पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या आणि सलग तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये अडकून पडलेले सुमारे ७० भाविक मंगळवारी सायंकाळी माघारी परतण्यास निघाले आहेत. गंगोत्री, सोनप्रयाग, पिंपळकोठी (मायापुरी), बद्रीनाथ या ठिकाणी अडकलेल्या भाविकांची सुटका करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक खासदार यांनी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधून पुरात फसलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंची नाशिकला निघण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली.
उत्तराखंड राज्यात पावसाच्या तडाख्यामुळे आलेल्या प्रचंड पुरात चारधाम यात्रेसाठी वेगवेगळ्या पर्यटन संस्थेमार्फत गेलेले उत्तर महाराष्ट्रातील ३०० ते ४०० भाविक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यात उत्तर काशी-गुप्त काशी मार्गावर ७० भाविक, बद्रीनाथ येथे ५०, पिपलकोटी २५, हरिद्वार ५० यात्रेकरूंचा समावेश आहे. उत्तर काशी – गुप्त काशी मार्गावरील दरड बाजुला सारण्याचे काम काहीअंशी झाल्यावर तीन दिवस अडकून पडलेल्या नाशिकच्या ७० भाविकांनी पुढील प्रवास रद्द करून माघारी परतण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सायंकाळी या मार्गावरून आम्ही डेहराडूनकडे निघालो असल्याची माहिती दत्तात्रय सोनजे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. चौधरी यात्रा कंपनीतर्फे गेलेले २०० हून भाविक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले असले तरी ते सुरक्षित असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. या यात्रेकरूंना तात्काळ सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनास दिले. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पुरात अडकून पडलेल्या भाविकांना अन्न, पाणी, निवासासह त्यांची नाशिकला निघण्याची व्यवस्था करण्यासाठी मदत करण्याचे उत्तराखंडच्या प्रशासनास आवाहन केले आहे.
याच पाश्र्वभूमीवर, खा. समीर भुजबळ यांनीही उत्तराखंडचे मुख्य सचिव सुभाष कुमार यांच्याशी संपर्क साधला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. नागरीक ९५६१४ ९९४४९, ०२५३ – २३१७१५१ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. जे भाविक यात्रेसाठी गेले आहेत आणि ते अडचणीत सापडले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तराखंडात अडकून पडलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी प्रयत्न
पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या आणि सलग तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये अडकून पडलेले सुमारे ७० भाविक मंगळवारी सायंकाळी माघारी परतण्यास निघाले आहेत. गंगोत्री, सोनप्रयाग, पिंपळकोठी (मायापुरी), बद्रीनाथ या ठिकाणी अडकलेल्या भाविकांची सुटका करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
First published on: 19-06-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government try to make up release nashik pilgrim of in uttarakhand