औरंगाबाद शहरात हज हाऊस व वंदेमातरम सभागृह सभागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याबाबतच शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदर दोन एकर जागेवरील ५३ रहिवाशांना पडेगाव येथे घरांसाठी प्लॉट व घरबांधणीसाठी दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली.
चव्हाण यांचे शुक्रवारी औरंगाबाद येथे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार अब्दूल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार एम. एम. शेख, आमदार सुभाष झांबड, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी कुणालकुमार यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, हज हाऊस व वंदेमातरम सभागृह उभारण्याबाबतचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. औरंगाबाद शहराचे वाढते महत्व पाहता ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. वंदेमातरम सभागृहाच्या रुपाने शहराला एक भव्य सभागृह मिळेल. तेथे प्रेक्षागृह, कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, प्रदर्शन हॉल अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. असेही चव्हाण म्हणाले. प्रस्तावित जागेवरील रहिवाशांचे स्थलांतर व्हावे यासाठी त्यांना पडेगाव येथे दोन महिन्यात प्लॉटसह सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी सिडको, महानगरपालिका, वक्फ बोर्ड, सार्वजनिक बांधकाम विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader