आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तामुळे जगभरात विविध क्षेत्रात क्रांती झाली आहे. संगणक क्रांतीनंतर ‘एआय’मुळे जवळपास प्रत्येक कामाच्या स्वरूपांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. याचाच वापर आता सरकार त्यांच्या प्रशासकीय कामात करणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारचा गुगलबरोबर करारही आज झाला. या करारामुळे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात आता एआयचा सक्षमपणे वापर केला जाणार आहे. परंतु, एआयच्या वापरामुळे महाराष्ट्रातील रोजगार संपुष्टात येणार का? एआयमुळे किती रोजगार जाणार याबाबत मोठा प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुगल एक अत्यंत महत्त्वाची टेक्नोलॉजी कंपनी आहे. या कंपनीचा जगभरात प्रचंड मोठा विस्तार आहे. टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात ही कंपनी एक पाऊल पुढे राहिली आहे. गुगलने एआयमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलंय. त्यामुळे त्यांनी लोकोपयोगी एआय विचार मांडला आहे. त्यांची हीच शक्ती महाराष्ट्रात कशी वापरता येईल यासंदर्भातील हा करार आहे.
हेही वाचा >> “…म्हणून राजीनामा दिल्याचं जाहीर केलं”, छगन भुजबळांनी केला खुलासा; म्हणाले, “खुर्चीला चिकटून…”
“शेती, सस्टेनेबिलिटी, स्टार्टअप, हेल्थकेअर, कौशल्य आदी विविध क्षेत्रात आम्ही (सरकार आणि गुगल) एकत्र काम करणार आहोत. एआयमुळे लोकांचं जीवन बदलू शकतं, प्रशासकीय कामात सुधारणा होऊ शकते. काही ॲप्स त्यांनी दाखवले. त्यानुसार शेतकऱ्याच्या जमिनीत काय पिकवलं पाहिजे, त्याची वाढ कशी झालीय याचं मॉनिटरिंग आणि डेटा मिळू शकतो. या मोबाईल ॲपवरून शेतकऱ्याने काय वापरलं पाहिजे, त्यावर कोणती किड येऊ शकते हे शेतकरी जाणून घेऊ शकतो. असे अनेक ॲप आहेत”, असं उदाहरणही त्यांनी दिलं.
रोजगाराच्या संधी घटणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एआयसंदर्भातील माहिती देत असताना पत्रकारांनी रोजगारासंदर्भात प्रश्न विचारला. या कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अनेक रोजगार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर झाल्यास किती रोजगारांवर गदा येईल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, एआयमुळे रोजगाराच्या असिमीत संधी उपलब्ध होणार आहेत. एआय आल्यानंतर रोजगाराचं काय होईल असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. परंतु, यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्या संधींकरता आपलं राज्य फ्युचर रेडी होतंय.”