आर्थिक नुकसानामुळे कंत्राटदारांचाही नकार

रवींद्र जुनारकर, गडचिरोली</strong>

नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड-ओरिसाच्या दंडकारण्य प्रदेशात राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रस्त्यांच्या कामांवरील वाहनांच्या जाळपोळीचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. आर्थिक नुकसानामुळे कंत्राटदारही काम करण्यास तयार नसल्याची  माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगड-ओरिसा या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे काम करणाऱ्या वाहनांची जाळपोळ सुरू केली आहे.

३० एप्रिलच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हय़ातील पुराडा पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या दादापूर येथे राज्य महामार्गाच्या कामावरील ३६ वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी कुरखेडापासून जवळच जांभूळखेडा येथे भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात १५ पोलीस शहीद झाले. त्यानंतर ८ मे रोजी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील कारका गावाजवळ रस्त्याच्या कामावरील पाण्याचा टँकर व मिक्सर मशीन जाळले.

१३ मे रोजी एटापल्ली तालुक्यात येमली-मंगुठा रस्त्याच्या कामावरील वाहने व यंत्रसामुग्री जाळली. त्यानंतर छत्तीसगड राज्यातील किरंडूल येथे ४ वाहनांची जाळपोळ व आज ओरिसातील कालाहंडी येथे ११ वाहनांची जाळपोळ केली.  रस्त्यांच्या कामासाठी कोटय़वधी रुपयांची यंत्रसामुग्री वापरली जाते. या सर्वाचा विमा राहत असला तरी नक्षल्यांनी वाहने जाळल्यानंतर कंत्राटदारांना काही प्रमाणात आर्थिक नुकसानासोबतच पोलीस तपास व इतरही गोष्टींचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा नक्षलवादी कंत्राटदाराला काम पूर्ण न करण्यासाठी धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदार अर्ध्यावर काम सोडून निघून जातात.

खंडणीसाठी जाळपोळ

नक्षलग्रस्त भागात रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांना नक्षलवाद्यांनाही खंडणी द्यावी लागते. दादापूरची जाळपोळीची घटना ही अर्थकारणातूनच झाल्याची माहिती आहे. नक्षलवाद्यांची मागणी पूर्ण केली नाही तर नक्षली वाहनांची जाळपोळ किंवा हत्यासत्र करतात. सध्याही नक्षलवाद्यांनी तोच मार्ग अवलंबला आहे. रस्ते कंत्राटदारांकडून तसेच तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी गोळा करण्यासाठीच या काळात मोठय़ा प्रमाणात वाहन जाळपोळीच्या घटना घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader