अलीकडेच राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक आणि वेटलिफ्टिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आता राज्यस्तरीय शालेय कबड्डी, खो-खो आणि पायका वेटलिफ्टिंग या स्पर्धाचे शिवधनुष्य उचलण्यास सज्ज झाले असून २२ ते २३ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये होणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत या स्पर्धेसंदर्भात माहिती दिली. उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत मुंबई, अमरावती, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर आणि यजमान नाशिक असे आठ विभागातील खेळाडू सहभागी होणार आहेत. १४ वर्षांआतील कबड्डी, १९ वर्षांआतील खो खो आणि १६ वर्षांआतील गटात पायका वेटलिफ्टिंग स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या स्पर्धेत निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचा एकूण खर्च सुमारे १८ लाख रुपये असून त्यापैकी तीन लाख रुपये शासकीय अनुदानातून उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरित निधी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती सुधीर मोरे यांनी दिली.
स्पर्धेचा समारोप रविवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस प्रबोधिनीचे उपसंचालक डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार झा, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नगरचे खो-खोपटू निर्मल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. क्रीडाप्रेमींनी या स्पर्धासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मोरे यांनी केले आहे.

Story img Loader