राळेगणसिद्धीचे माजी सरपंच गणपतराव औटी यांच्या स्मरणार्थ राळेगणसिद्घी परिवाराच्या वतीने राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचास दरवर्षी आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात येणार असून एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वतीने शनिवारी करण्यात आली.
माजी सरपंच औटी यांचे दहा दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे ते सुरुवातीपासूनचे निकटचे सहकारी होते. औटी यांना श्रद्घांजली वाहण्यासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रांतील सुमारे पाच हजारांवर जनसमुदाय शनिवारी उपस्थित होता.
औटी यांना श्रद्घांजली वाहताना हजारे यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. औटी यांनी मला श्रद्घांजली वाहायला हवी होती, मात्र त्याच औटींना श्रद्घांजली वाहण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असे सांगताना हजारे यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्यानंतर हजारे यांच्या सूचनेवरून औटी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी राज्यातील सरपंचाला आदर्श सरपंच पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच जयसिंग मापारी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. माजी मंत्री बबनराव पाचपुते, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर, माजी आमदार राजीव राजळे, बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जि.प.च्या कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे, बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगलदास बांदल आदींनी या वेळी औटी यांना श्रद्घांजली अर्पण केली.