वीज दरवाढीस विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक संघटना व वीज ग्राहक संघटनांनी ‘वीज ग्राहक व औद्योगिक समन्वय समिती’ स्थापन केली असून, या समितीची व औद्योगिक संघटनांची राज्यस्तरीय बैठक लवकरच नाशिक येथे होणार आहे.
अकोला येथे झालेल्या औद्योगिक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत औद्योगिक वीज दरवाढीविरोधात १३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कार्यालयांसमोर घंटानाद, १५ व १६ डिसेंबरला जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींना घेराव, १८ डिसेंबरला नागपूर येथे धरणे, याप्रमाणे आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. बैठकीत नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) तर्फे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यावतीने नाशिकमध्ये निमा व औद्योगिक संघटनांनी वीज दरवाढीविरोधात केलेली आंदोलने व प्रयत्नांची माहिती दिली. आतापर्यंत शासन व महावितरण कंपनीकडून वीज दरवाढ रद्द करण्याबाबत निश्चित स्वरूपाची भूमिका स्पष्ट होत नसल्यामुळे वीज दरवाढीस तीव्र विरोध करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी केली. त्यानुसार ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, आर. बी. गोयंका, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भचे अध्यक्ष किरण पातुरकर, अकोला असोसिएशनचे द्वारकादास चांडक, नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे कार्यकारी सचिव अविनाश पाठक, अंबड असोसिएशन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे नितीन पगारे आदी उपस्थित होते.