सांगलीचे महापौरपद खुल्या वर्गासाठी असल्याचे सोडतीत निश्चित झाले. तब्बल १० वर्षांनंतर महापौरपद खुले झाल्याने महापालिकेतील मातबर मंडळी नवीन राजकीय गणित मांडण्यासाठी पुढे सरसावण्याचे संकेत मिळत असतानाच विद्यमान महापौरांना देण्यात आलेला सव्वा वर्षांचा अवधी संपत आल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
राज्यातील २३ महापालिकांच्या महापौर पदासाठी मुंबईत सोडत काढण्यात आली. त्यामध्ये सांगली मिरज आणि कूपवाड महापालिकेसाठी खुला प्रवर्ग निघाला.
दरम्यान, विद्यमान महापौर श्रीमती कांचन कांबळे यांना सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपत आली असली, तरी नवीन महापौर निवड विधानसभा निवडणुकीनंतरच होणार आहे. रिपाइंचे जिल्हाध्यक्षपद सोडून केवळ महापौरपद डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसवासी झालेले विवेक कांबळे मिळणाऱ्या अल्पावधीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याशिवाय अश्विनी कांबळे, शेवंता वाघमारे, सुरेखा कांबळे याही महापौर पदासाठी दावेदार आहेत.
आगामी महापौरपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या डझनावर पोहोचण्याची शक्यता आहे. माजी महापौर किशोर जामदार पुन्हा एकदा महापौर पदासाठी शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महापौरपदाची संधी हुकलेले सुरेश आवटी, स्थायी सभापती राजेश नाईक, हारूण शिकलगार, संतोष पाटील, दिलीप पाटील, प्रदीप पाटील, महिलांतून रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, अनारकली कुरणे, आएशा नायकवडी आदींना संधी आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महापौर पदाचे राजकीय संदर्भ अवलंबून राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा