Yogesh Kadam on Pune rape case: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोची पाहणी करून पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पीडितेने प्रतिकार केला नसल्याबाबत विधान केले होते. प्रतिकार झाला असता तर तिथे बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना घटना रोखता आली असती, असे विधान त्यांनी केले होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून सदर विधान असंवेदनशील असल्याचा आरोप केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल भूमिका मांडली. आता खुद्द योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत विधानाचा विपर्यास झाला असल्याचे म्हटले.

काय म्हणाले योगेश कदम?

आज माध्यमांशी बोलत असताना योगेश कदम म्हणाले, “आमचे सरकार लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिला अत्याचाराबाबत झिरो टोलरन्स हे आमचे पहिल्या दिवसापासूनचे धोरण राहिले आहे. गृहराज्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पोलीस आयुक्तांच्या मी स्वतः बैठका घेतलेल्या आहेत. महिला अत्याचार प्रकरणात आरोपीविरोधात कडक कारवाई करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत.”

पोलिसांनी दिलेली माहितीच मी बोललो…

“काल मी जे विधान केले, त्याचा विरोधकांकडून विपर्यास केला जात आहे. स्वारगेट आगारात मी जेव्हा काल भेट दिली, तेव्हा मला दिसले की, ती रहदारीची जागा होती. रहदारीचा परिसर असून आमच्या भगिनीवर अत्याचार होत असताना कुणीच कसे मदतीसाठी आले नाही, हा प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यांनी मला जे उत्तर दिले, ते मी पत्रकार परिषदेत सांगितले. पण माझ्या विधानाचा विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे”, असेही योगेश कदम म्हणाले.

विरोधकांचे आरोप चुकीचे

योगेश कदम पुढे म्हणाले, “मी कालदेखील म्हटले होते की, आरोपी जेव्हा पकडला जाईल, तेव्हा त्याच्यावर कडक कारवाई केली पाहीजे. त्यामुळे आरोपीला वाचविण्यासाठी मी कोणतेही विधान केलेले नाही. उलट त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस दोन दिवसांपासून मेहनत घेत होते. पोलिसांची कारवाई योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी मी स्वारगेटचा दौरा केला होता. कडक कारवाई करा, या सूचना देण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आरोपीला वाचविण्याचा आमचा प्रयत्न होता, हे आरोप धादांत खोटे आहेत.”

Story img Loader