ढगाळ वातावरणामुळे मुंबईत उकाडा
वायव्य दिशेकडून (उत्तर-पश्चिम) येणाऱ्या उष्ण व कोरडय़ा वाऱ्यांनी उत्तर, मध्य तसेच पूर्व भारताचा ताबा घेतला असून, पंजाब-हरयाणापासून ते ओरिसापर्यंत सर्वच पट्टय़ात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भात तापमानाने अनेक ठिकाणी उच्चांक गाठला. चंद्रपूर (४७.९ अंश), तर अमरावती (४७.८), नागपूर (४७.५) या ठिकाणांसह राज्यात बहुतांश ठिकाणी सोमवारी सर्वात उष्ण दिवस अनुभवायला मिळाला. पुढील दोन दिवसही अशीच लाट कायम राहणार असल्याने या उकाडय़ापासून लगेच तरी सुटका होण्याची शक्यता नाही.

उकाडय़ाचे कारण ?
मुंबई : चंद्रपूर, नागपूर आणि अन्य शहरांतील वाढत्या तापमानाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरात तापमान कमी आहे. मात्र ढगाळ आकाश आणि सापेक्ष आद्र्रतेतील वाढीमुळे मुंबईकरांना प्रचंड उकाडय़ाला सामोरे जावे लागत आहे.  मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता अनुक्रमे (३३.६ कमाल व २६.८ किमान) तसेच (३४.३ कमाल व २८.२ किमान) अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर अनुक्रमे ६९ व ७९ टक्के इतक्या सापेक्ष आद्र्रतेची नोंद झाली. हवामान खात्याच्या दृष्टीने ही सापेक्ष आद्र्रता सामान्य आहे. मात्र ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग फारसा नसल्याने अधिक उकाडा जाणवत असावा, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

मान्सूनची आगेकूच  
मान्सूनचा पुढचा प्रवास सुरूच असून, तो सोमवारी अंदमान-निकोबार बेटे ओलांडून बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकला. मान्सून गेल्या शुक्रवारी मान्सून अंदमान बेटांवर पोहचला होता. त्याने सोमवारी आपली पुढील प्रवास केला. त्याने आता बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडील भाग, संपूर्ण अंदमान समुद्र व्यापला आहे. येत्या दोन दिवसात तो आणखी पुढे सरकेल. अंदमान निकोबार बेटांवर जोरदार पाऊस पडत असून, तिथे येत्या चोवीस तासांतही जोरदार पावसाची शक्याता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.