कराड: कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे ऑलिम्पिकवीर पहिलवान खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचे सादरीकरण मुंबईमध्ये आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले. कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप या प्रसंगी उपस्थित होत्या.

भारताला खाशाबा जाधव यांनी पहिले ऑलिम्पिक पदक सन १९५२ साली मिळवून दिले. त्यांच्या या उत्तुंग कार्याचे स्मरण व्हावे, त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी खाशाबांच्या गोळेश्वर गावी हे संकुल उभारण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. या संकुलाच्या कामाला गती मिळण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले पाठपुरावा करीत आहेत.

मुंबईतील शशी प्रभू ॲण्ड असोसिएट्सने या कुस्ती क्रीडा संकुलाचा आराखडा बनवला असून, ज्येष्ठ वास्तुविशारद अमृता पारकर यांनी त्याचे सादरीकरण केले. कुस्तीसाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय निकष, दर्जा लक्षात घेऊन हा आराखडा तयार केल्याचे पारकर यांनी सांगितले. जवळपास ३० हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या या संकुलात कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन मॅट मैदाने, खेळाडूंसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, २५ मुले व २५ मुली असे ५० जण प्रशिक्षणासाठी राहू शकतील, अशी सुसज्ज निवास व्यवस्था, कार्यालय, ऑडिओ-व्हिज्युअल रूम, प्रथमोपचार कक्ष, आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रकाश व्यवस्था, वाहनतळ आदी सुविधांचा त्यात समावेश असल्याचे अमृता पारकर यांनी सांगितले.

दरम्यान, या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोरही होणार आहे. कुस्तीतील खेळाडू, प्रशिक्षकांच्या सूचनाही विचारात घेऊन हा आराखडा अंतिम करणार असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले आहे.

खाशाबांचे स्मृतिसंग्रहालय

ऑलिम्पिकवीर मल्ल खाशाबा जाधव यांची प्रेरणा क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकाला मिळावी, यासाठी या संकुलात स्मृती संग्रहालयही असेल. यामध्ये खाशाबा जाधव यांना मिळालेली पदके, प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे ठेवण्यात येणार आहेत. तसेच पुस्तकांचे ग्रंथालय व खाशाबा जाधव यांचा पुतळासुद्धा उभारला जाणार असल्याचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

कुस्ती क्षेत्रातून स्वागत

खाशाबा जाधव यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हेलसिंकी येथील सन १९५२ मधील ऑलिम्पिक स्पर्धेतून भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मात्र, त्यांच्या या उत्तुंग कार्याची सरकार दरबारी उपेक्षाच झाली. केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्काराने आजवर त्यांचा सन्मान केला नसल्याची सल कुस्ती क्षेत्रात राहिली आहे. मात्र, आता खाशाबांच्या मूळ गावी गोळेश्वर (ता. कराड) येथे त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे भव्यदिव्य कुस्ती क्रीडा संकुल उभे राहत असल्याने त्याचे कुस्ती क्षेत्रातून स्वागत होत आहे. या संकुलासाठी स्थानिक विधानसभा सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. या संकुलाची मंजुरी व निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्र्यांचे मोठे सहकार्य मिळत आहे.