केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रावर कडी केली असून, त्यांनी राज्य विकायला काढले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर राजकारणात सेवाभाव राहिलेला नाही अशी खंत नगर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे यांनी व्यक्त केली.
प्रचारासाठी येथे आले असताना कोळसे पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनिता दिघे या वेळी उपस्थित होत्या. कोळसे म्हणाले, सरकारवर आता लोकांचा भरवसा राहिलेला नाही. राज्य सरकारला बारामती, इंदापूर, अकलूज सोडून इतरांना पाणी देण्याची इच्छाच नाही. जामखेडला हक्काचे ६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. कृष्णा खोऱ्याच्या लवादाप्रमाणे जादा ठरलेले ८१ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले आहे. त्यातून जामखेडला पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी पाण्याचे समान वाटप होणे गरजेचे आहे. पाण्याच्या प्रश्नावर जनशक्ती उभी करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु गेंडय़ाच्या कातडीचे सरकार, नेते आंदोलनाला भीक घालत नाही, म्हणून आपण सत्तेत गेले पाहिजे. मी निवडून येवो न येवो जामखेडला वाऱ्यावर सोडणार नाही.
दिघे यांचा निर्णय व्यक्तिगत
दिघे यांनी येथे कोळसे यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले. याबाबत नगर येथे मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचे स्पष्ट केले. पक्षाने तटस्थ राहण्याचीच भूमिका घेतली असून कोणालाही पाठिंबा देण्याचा निर्णय अद्यापि झाला नाही असे ते म्हणाले.

Story img Loader