एसटीच्या तिकीट दरात दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. 20 दिवसांसाठी ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ही भाडेवाढ लागू आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीवेळी दरवाढ केली जाते. त्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.
गत वर्षी दिवाळीच्या सुट्टीत सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होईल.
एस टी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्केपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते.
दिवाळी किंवा इतर सणावाराच्या वेळी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करतात. याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवण्यात येतो आहे. परंतु, आता एसटीनेही महसूल वाढीसाठी हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा नाहक फटका बसणार आहे.