डिझेल दरवाढीमुळे एस. टी. महामंडळाला दरमहा २० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. महामंडळाचा संचित तोटा २८७ कोटींवर पोहचला असून, नवीन कामगार करारामुळे एस.टी.ला ४१७ कोटींचा बोजा पडणार आहे, अशी माहिती एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी कणकवलीत दिली.
कणकवलीत विभागीय एस.टी. कार्यशाळा व कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यावर पत्रकारांशी बोलत होते. एस.टी.कडे प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असून, चालक-वाहकासाठी योजना व प्रवाशांना सेवा-सुविधा देण्याचा विचारही जीवन गोरे यांनी व्यक्त केला.
डिझेल दरात दरमहा ४५ पैशांनी होणाऱ्या वाढीमुळे महामंडळाला २० कोटींचा तोटा होत आहे. महामंडळ कागदोपत्री फायद्यात असले तरी संचित तोटा २८७ कोटींवर पोहचला आहे, असे ते म्हणाले. सुरक्षित प्रवासाला एस. टी. महामंडळ विश्वासाहार्य आहे. चालक-वाहकांची कमतरता भरून काढण्यासाठी १५ एप्रिल ते १ मे दरम्यान भरती प्रक्रिया होणार आहे असे ते म्हणाले.
तसेच चालक-वाहकांसाठी गतवर्षीच्या उत्पन्नापेक्षा २४ टक्के रक्कम त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे, असे जीवन गोरे म्हणाले. कामगार कराराला महामंडळाने मान्यता दिली आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन ४४ ते ७० टक्क्य़ांनी वाढणार आहे, तर मार्ग भत्ता वगळता अन्य भत्त्यातही दीडपट वाढ करण्यात आली आहे. मात्र नियमित वेतनश्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १० टक्के वाढ होत आहे. ती वाढविण्याची संघटनेची मागणी आहे. सध्याच्या करारानुसार महामंडळाला ४१७ कोटींचा बोजा पडणार असल्याचे गोरे म्हणाले.
शासनाकडून महामंडळाला १६८९ कोटी रुपये येणे आहेत. ही रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून शासनाने आतापर्यंत ४०० कोटी रुपये दिले आहेत. स्पेअर पार्टचा तुडवडा भासत असून नवीन गाडय़ा देण्याची मागणी आहे. तसेच मिडी गाडय़ांसाठी दुरुस्ती यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.
एस.टी. बसमधून आमदार-खासदारापासून सर्वानी महिन्यातून किमान १०० ते १५० कि.मी. प्रवास करावा, जेणेकरून एस.टी.ला प्रतिष्ठा मिळेल असे आवाहनही केले आहे.
एस.टी.ची प्रतिष्ठा, सुरक्षितता वाढवावी, नवीन बसेस  धावाव्यात म्हणून प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले.

Story img Loader