ऊसदरावरून सुरू असलेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारीसुद्धा राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) सहा बसेसवर दगडफेक झाली. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण दिवसभर कोल्हापूर व सोलापूर मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे स्वारगेट डेपोतून सुमारे ३४५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आणि इतर डेपोंच्या शेकडो बसेसही रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले. ही सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्याचे एस. टी.च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बसगाडय़ा रद्द झाल्याने खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून तिप्पट-चौपट भाडेआकारणी करून लूट केली.
पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील आणेवाडी जकातनाक्याजवळ मंगळवारी सकाळी टायर पेटवून टाकण्यात आले होते. तसेच, तीन बसेसवर दगडफेक झाली. ही माहिती सातारा डेपोकडून समजताच, मार्गावरील बसेस सातारा येथे थांबविण्यात आल्या आणि मंगळवारच्या सर्व फेऱ्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पुणे-सातारा दरम्यान खंडाळा येथेही तीन बसवर दगडफेक झाल्याने या दरम्यानच्या बसही बंद ठेवण्यात आल्या. याशिवाय पुण्यातून सोलापूर रस्त्यावरील बसेसही बंद ठेवण्यात आल्या. मंगळवारी दिवसभरात कोल्हापूर, सांगली, सातारा मार्गावरील २४९ फेऱ्या आणि सोलापूर रस्त्यावरील तब्बल ९६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय इतर डेपोच्या अनेक बसही बंद आहेत. एसटीतर्फे सोमवारी पावणेदोन हजार प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे परत करण्यात आले.    

कोल्हापुरात दिवाळीऐवजी शिमगा..
आंदोलन शमले असले तरी दिवाळी दिवशी शिमगा कसा होतो याचा प्रत्यय मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्य़ात आला. पोलीस गोळीबारात ठार झालेल्या चंद्रकांत नलावडे यांच्या संदर्भातील चौकशी न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आश्वासन सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला. दोन्ही जिल्ह्य़ांत तणावपूर्ण शांतता होती.

Story img Loader