तेल कंपन्यांनी खासगी उद्योग आणि महामंडळांसारख्या घाऊक खरेदीदारांना विकण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे रत्नागिरी विभागातील एसटीच्या गाडय़ा आता खासगी पंपावरून डिझेल भरू लागल्या आहेत.
तोटा भरून काढण्यासाठीचा उपाय म्हणून तेल कंपन्यांनी खासगी उद्योग आणि महामंडळांना विकण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात गेल्या १७ जानेवारीपासून प्रति लिटर एकदम ११ रुपये ६२ पैशांनी वाढ केली. यामध्ये एसटी महामंडळाचाही समावेश आहे. त्या दराने डिझेल घेतल्यास प्रवासी भाडय़ामध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ करणे एसटीला भाग पडणार आहे. अन्यथा काही मार्गावरील गाडय़ा बंद कराव्या लागतील किंवा एसटीला जबर तोटा सहन करावा लागेल. यावर उपाय म्हणून खासगी पंपांवरून डिझेल खरेदीला परवानगी देण्यात आली आहे.
रत्नागिरी एसटी विभागातील गाडय़ांसाठी दररोज सुमारे ४५ हजार लिटर डिझेल लागते. वाढीव दराने ते खरेदी केल्यास विभागाला एकूण सुमारे दीड कोटी रुपयांचा फटका बसला असता. तो टाळण्यासाठी डिझेल उपलब्ध असलेल्या पंपांकडून ही खरेदी केली जात आहे. तसेच काही ठिकाणी एसटी आगारातील उपलब्ध साठय़ातून ही गरज भागवली जात आहे. मात्र जिल्ह्य़ातील खासगी पंपांवर डिझेलचा मर्यादित साठा आणि एसटी महामंडळाच्या प्रशासकीय पद्धतीचा विचार करता हा पर्याय दीर्घ काळासाठी कितपत व्यवहार्य ठरेल, या विषयी शंका व्यक्त केली जात आहे.