लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वाची आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांनी मंगळवारी सांगलीत जोरदार शयतीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

शेकडो कार्यकर्त्यांसह पाटील यांनी आज गणेश मंदिरात दर्शनानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली. काँग्रेस समितीसमोर पदयात्रा आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे काही माजी नगरसेवकही उपस्थित होते.

आणखी वाचा-‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आमची काँग्रेसच्या विचारधारावर आजही श्रध्दा असून माझा लढा भाजपशी आहे. काँग्रेस आणि काही घराणी संपवावी यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. यामागे कोण आहे का आहे याचा समाचार निवडणुकीनंतर निश्‍चित घेतला जाईल. शिवसेना नेत्यांनी मशाल घेउन निवडणुक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आपण काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत. आपण डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून हे कोणाला बघवलं नसावे. अजूनही आपणाला काँग्रेसची उमेदवारी मिळेल असा विश्‍वास वाटतो. तरीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली असून कोणत्याही स्थितीत आता माघार घेणार नाही. जिल्ह्यातील ३८ हजार मतदारांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेला कौल मान्य करत लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

आणखी वाचा-महाविकास आघाडीचे ओम राजेनिंबाळकरांची उमेदवारी दाखल

ते पुढे म्हणाले, माझी उमेदवारी म्हणजे काँग्रेसमधील बंड नसून काँग्रेसचेच बंड आहे. आम्हालाही शेतकरी पुत्राने आमदार, खासदार व्हावे वाटते, मात्र शेतकरी पुत्राचा राजकीय बळी जाउ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे असा टोला त्यांनी उबाठा शिवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील यांना लगावला. तर करोना काळ आणि महापूराच्या काळात आम्ही कार्यकर्त्यासमवेत लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर होतो, मात्र भाजपचे खासदार कुणाचा भूखंड स्वस्तात मिळतो का याची चाचपणी करत होते असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State vice president of the congress vishal patil warned mahavikas aghadi about rebellion mrj