उद्योगपती गौतम अदानींबद्दलचे आमचे प्रश्न कायम असून, अदानी हे आपल्यावरील आरोपातून बाहेर पाडण्याकरिता धडपडत आहेत. कुठून तरी आपल्याला मदत मिळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोण कोणाला भेटले याच्याशी काहीही घेणे-देणे नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.हिंडेनबर्ग रिसर्च अहवालानंतर सर्वदूर उलटसुलट चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट देऊन दोन तास चर्चा केल्याबाबत विचारले असता, चव्हाण बोलत होते.
कुणी कोणाला भेटायचे मी कस सांगणार? त्यांचे जुने संबंध आहेत. त्यांचे सहकार्य घेण्याकरिता अदानी भेटले असतील. मी काय बोलणार? आमचा अदानीबद्दलचे प्रश्न कायम आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे गौतम अदानी, शरद पवार यांनी नव्हेतर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवीत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. कारण याबाबतचे आरोप पंतप्रधानांवर झालेत. केजरीवाल, राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.
ते २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत. याचे काहीही उत्तर आलेले नाही. आणि आत्ता त्यांनी काहीतरी उत्तर दिले आहे. त्यात मी कंपन्या विकून पैसे उभे केलेत. मग त्यांनी कंपन्यांच्या माध्यमातून मॉरीशिसमधून पैसे का गुंतवले? आपल्या भारतात का गुंतवले नाहीत? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे कोण कुणाला भेटलय याबद्दल आमचे काही दुमत नाही. पण, ज्यांच्यावर गंभीर आरोप झालेत त्या आरोपातून बाहेर पाडण्याकरिता अदानी धडपडत आहेत. जो अडकलेला असतो तो कुठूनतरी आपल्याला मदत मिळवण्याचा प्रयत्न करत असतो असे चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानीप्रकरणी उपस्थित प्रश्नांवर उत्तरे दिली पाहिजेत. ते २० हजार कोटी कोणाचे? याबाबत अरविंद केजरीवाल यांनी थेट आरोप केलेले आहेत. तुम्ही किती दिवस या आरोपापासून पळ काढणार? असे सवाल उपस्थित करून, उत्तरे नसल्यानेच हे प्रकरण भटकवण्याकारिता इतर गोष्टी चाललेल्या असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. हे सारे जनता बघत आहे. ती सुज्ञ असल्याने यावर काय तो निष्कर्ष काढेल असे चव्हाण म्हणाले.