सटाणा तालुक्यातील मांगी-तुंगी येथे उभारण्यात येणाऱ्या १०८ फुटी वृषभदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता असूनही प्रशासकीय पातळीवरून कामे संथपणे सुरू असल्याची तक्रार खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सोमवारी खा. चव्हाण यांनी या ठिकाणी अचानक भेट देऊन कामांचा आढावा घेतला असता जैन तपस्वी व साध्वींनी कामांच्या संथपणाबद्दल गाऱ्हाणे मांडले. ही बाब खा. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
जैन धर्मियांच्या मांगी-तुंगी या तीर्थक्षेत्र परिसरात १०८ फूट उंचीच्या वृषभ देवतेची भव्य मूर्ती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फेब्रुवारीत होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांना देण्यात आले आहे. राज्य शासनाने या भागात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे १९ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. उपरोक्त सोहळ्यास लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने सोयी-सुविधा, रस्ते, निवारा, वीज आदी कामे प्रगतिपथावर आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त समीप येत असूनही ही कामे संथपणे सुरू असल्याची तक्रार जैन धर्मीय तपस्वी व साध्वींनी खा. चव्हाण यांच्याकडे केली. डोंगरावरील तीर्थक्षेत्रातील कामांची पाहणी चव्हाण यांनी केली. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून प्रशासन संथपणे काम करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा