वाई : साताऱ्यातील एका सुपुत्राने जम्मू काश्मीरात भारतीय सैन्य दलाच्या केंद्रात सर्वप्रथम उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानंतर आता आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून, त्याचे नुकतेच अनावरण झाले आहे. ही बाब सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमान व गौरवाची ठरली आहे.
भोसे (ता. कोरेगाव) येथील लेफ्टनंट कर्नल अमित विजय माने यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांसह जम्मू काश्मीरात कुपवाड्यामध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फंट्री) बटालीयनमध्ये सात नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. त्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी तेथे जाऊन समारंभपूर्वक केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या स्वराज्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या नागठाणे (ता. सातारा) येथील रविराज नलवडे यांनी पुढाकार घेत आसाममध्ये सैन्य दलाच्या केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.
हेही वाचा – एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
चीनच्या सीमेवर आसाममधील जोहाट येथे भारतीय सैन्य दलाच्या २१ पॅरा स्पेशल फोर्स मराठा २१ युनिटचे कमान अधिकारी कर्नलपदी रविराज नलवडे (सेना मेडल) हे कार्यरत आहेत. त्यांनी व पूर्वोत्तर सीमेवर संरक्षणार्थ तैनात असलेल्या मराठासह इतर युनिटमधील अधिकारी, जवानांनी एकत्र येत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प केलेला होता. त्यानुसार सर्वांनी स्वनिधीमधून पुतळा आणून, संरक्षक दलाची परवानगी वगेरे बाबी पूर्ण करून युनिटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण नुकतेच लेफ्टनंट जनरल हरजितसिंग साही यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रथम रविराज नलवडे यांचा पुढाकार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुतळा उभारणीतील यशस्वी योगदानाचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जवानांना मात्रुभूमीचे रक्षण करण्याची सतत प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी श्री. नलवडे, २१ पॅराचे पाहिले कमान अधिकारी व्ही. बी. शिंदे, आजी माजी अधिकारी, सैनिक उपस्थित होते.
हेही वाचा – विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
आसामध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यामुळे भारतीय सैन्य दलात कार्यरत अधिकारी, जवानांना जशी प्रेरणा मिळेल तद्वतच पुतळ्यामुळे शत्रूवर कायम दहशत राहील. – हरजितसिंह साही, लेफ्टनंट जनरल