यंत्रमाग उद्योग समूहासाठी वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याप्रकरणी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर आणि त्यांचे बंधू महादेव हाळवणकर यांना दिलेल्या शिक्षेच्या आदेशाला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए. शहापुरे यांनी हाळवणकर बंधूंना ३ वष्रे कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. यामुळे हाळवणकर यांच्या आमदाराकीवर टांगती तलवार उभी राहिली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालामुळे विधानसभेचं सदस्यत्व अबाधित राहणार आहे. या निर्णयानंतर हाळवणकर समर्थकांनी इचलकरंजीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.  
आमदार सुरेश हाळवणकर आणि त्यांचे बंधू महादेव हाळवणकर यांच्या मालकीचा कोरोची येथे गणेश उद्योग समूह नावाचा यंत्रमागाचा कारखाना आहे. या उद्योग समूहासाठी वापर असलेल्या विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचं वीज मंडळाच्या भरारी पथकानं उघडकीस आणले होते.  या प्रकरणी सुरेश हाळवणकर आणि महादेव हाळवणकर यांच्या विरोधात वीज मंडळानं गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या सुनावणीनंतर निकाल देताना न्यायाधीश शहापुरे यांनी हाळवणकर बंधूंना इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट मधील कलम १३५ आणि १३८ अशा दोन गुन्ह्यांत ३ वष्रे शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ३ मे रोजी सुनावली होती. अपिलासाठी न्यायालयाने निकालाला स्थगितीही दिली होती. या मुदतीत आमदार हाळवणकर यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दर्शवली आहे.

Story img Loader