नाशिक शहर एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. पण आज याच नाशिकमध्ये मनसेची मोठी घसरण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास नाशिकमध्ये अजूनही मनसेला गमावलेला जनाधार पुन्हा मिळवता आला नसल्याचे स्पष्ट होते. १० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक आणि मध्य नाशिक या मतदारसंघात मनसेचे वर्चस्व होते.
पण आज याच मतदारसंघात मनसेला संघर्ष करावा लागत आहेत. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत पूर्व नाशिकमधून उत्तमराव ढिकले, पश्चिम नाशिकमधून नितीन भोसले आणि मध्य नाशिकमधून वसंत गीते निवडून आले होते. नाशिककरांनी मनसेच्या पारडयात भरभरुन मते टाकली होती. पण गटातटाचे राजकारण, प्रमुख नेत्यांनी सोडलेली पक्षाची साथ आणि भक्कम संघटनात्मक बांधणीचा अभाव याचा फटका मनसेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बसला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांनी भाजपात प्रवेश करुन तिकीट मिळवले. महत्वाचं म्हणजे राहुल ढिकले यांनी नाशिक पूर्वमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूकही जिंकली. त्यांनी ८५,८५१ मते मिळवली. त्यांच्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे बाळासाहेब सानप यांना ७३,७७० मते मिळाली. मनसेने तर इथे उमेदवार उभा केला नाही. मनसे विधानसभा निवडणूक लढणार की, नाही याबद्दल संभ्रमावस्था होती. त्यामुळे राहुल ढिकले यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवल्याचे बोलले जाते.
नाशिक पूर्वमधून देवयानी फरांदे ७३ हजार मते मिळवून दुसऱ्यांना आमदार म्हणून निवडून आल्या. खरंतर या मतदारसंघात मनसेचा उमेदवार दुसऱ्या स्थानी अपेक्षित होता. पण काँग्रेसच्या हेमलता पाटील ४४ हजार मते मिळवून दुसऱ्या स्थानी आहेत. मनसेचे नितीन भोसले २२ हजार मते मिळवून तिसऱ्या स्थानी आहेत.
नाशिक पश्चिममध्येही तशीच स्थिती आहे. इथून भाजपाच्या सीमा हिरे ७७ हजार मते मिळवून निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपूर्वा हिरे यांना ६७ हजार मते मिळाली तर मनसेच्या दिलीप दातीर यांना २५,५०१ मते मिळवून तिसऱ्या स्थानी राहिले.
हे तिन्ही मतदारसंघ नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. २०१२ सालच्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेचे सर्वाधिक ४० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेत मनसेची सत्ता आली होती. सत्ताकाळात नाशिकमध्ये मनसेने चांगली कामे देखील केली. पण त्यानंतरही मनसेला नाशिकमध्ये पुन्हा यश मिळालेले नाही. तुम्ही विरोधकाच्या भूमिकेत असताना तुम्हाला पुन्हा गमावलेला जनाधार मिळवता येतो. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला हा जनाधार पुन्हा मिळवता आलेला नाही.