नक्षलवाद्यांनी २९ वर्षांत ४९३ निरपराध नागरिकांची अतिशय क्रुर हत्या केली. नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ात तब्बल ४५१, गोंदिया ३३ आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात ९, अशा एकूण ४९३ जणांच्या हत्येने पूर्व विदर्भात नक्षलवाद्यांची दहशत आजही कायम आहे.
नक्षलवाद्यांनी ज्या निरपराध नागरिकांच्या हत्या केल्या त्यात नागरिक, पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय असलेले नागरिक, कंत्राटदार, सरपंच, माजी सरपंच, पोलिस पाटील, माजी पोलिस पाटील, महिला, लग्नाचे वऱ्हाडी, आत्मसमर्पित नक्षलवादी, शिक्षक, जिल्हा परिषद सदस्य, वन कर्मचारी, कोतवाल, दुकानदार, पंचायत समिती सभापती, उपसभापती, ग्राम पंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सदस्य सीमा रस्ते संघटनेचे अधिकारी, कर्मचारी, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष आणि जिल्ह्य़ाच्या ठिकाणी, तसेच जिल्ह्य़ाबाहेर पोलिस भरतीसाठी गेलेल्या युवकांचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात दहशत कायम राहावी म्हणून नक्षलवाद्यांनी ३ ऑक्टोबर १९८२ रोजी सिरोंचा तालुक्यात आमरेडेली येथील शिक्षक नारायण राजू मास्टर याचे दोन्ही हात कापले. हा गडचिरोलीतील पहिला नक्षली गुन्हा होता. नक्षलवाद्यांनी पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून १ फेब्रुवारी १९८५ रोजी पहिली निरपराध व्यक्तीची हत्या केली. ती भामरागड तालुक्यातील धोंडराज येथील रामदास पुंगाटी या आदिवासी तरुणाची हत्या केली. नक्षल्यांचा बळी पडलेले आत्राम पहिले सरपंच आहे. आतापर्यंत नक्षल्यांनी ९ सरपंच व एक माजी सरपंचाची हत्या केली. नक्षलवाद्यांनी १४ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची हत्या केली. देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांनाही नक्षल्यांनी आपले बळी बनविले.
गावपातळीवर तलाठी आणि पोलिस पाटलांना मदत करणाऱ्या कोतवालांची हत्या केली. गावाची कायदा व सुव्यवस्था पाहणारे २४ पोलिस पाटील आणि ५ माजी पोलिस पाटलांना नक्षलवाद्यांनी ठार मारले. एवढेच नव्हे, तर जीवनात आनंदाचा क्षण असलेल्या लग्न प्रसंगातील नागरिकांनाही नक्षल्यांनी जीवे मारून क्रुरतेची सीमा गाठली. राजनांदगाव येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहनाला नक्षल्यांनी गडचिरोली-धानोरा दरम्यान भुसुरूंग स्फोटात उडविले. यात दोन महिला व चार पुरुषांसह सहा लग्न वऱ्हाडी ठार झाले. पोलिस भरतीसाठी गेलेल्या सहा युवकांची नक्षल्यांनी हत्या केली. पोलिसांना माहिती देण्याच्या संशयातून २०६ सामान्य नागरिकांना व दहशत कायम राहावी, यासाठी १८८ नागरिकांना ठार केले. नक्षलवाद्यांनी सर्वप्रथम सिरोंचा दलमची स्थापना केली. स्थानिक आदिवासी युवक- युवतींना नक्षल चळवळीत सहभागी करून घेण्याचे काम आंध्रप्रदेशातून येथे आलेल्या तेलगु भाषिक नक्षलवाद्यांनी केले. आताही नक्षलवाद्यांचे हत्यासत्र सुरूच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा