लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : नशेच्या वापरासाठी करण्यात आलेला सुमारे सहा लाखांचा औषधी इंजेक्शन, गोळ्यांचा साठा मिरज व सांगलीत जप्त करण्यात आला आहे. नशेबाजांसाठी चढ्या दराने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. जिल्ह्यात आजपर्यंतची सर्वांत मोठी ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले.
सांगली व मिरज शहरात नशेबाज तरुणांकडून अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याच्या तक्रारी असून, या नशेत काही हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. याची दखल घेत अधीक्षक घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी या अवैध व्यवहाराची पाळेमुळे शोधून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
आणखी वाचा-सुशील कराडविरुद्धची खासगी फिर्याद सोलापूर न्यायालयाने फेटाळली
या आदेशानुसार पोलीस कार्यरत असताना मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, उदय कुलकर्णी, राहुल क्षीरसागर, धनंजय चव्हाण, विनोद चव्हाण, नानासाहेब चंदनशिवे, जावेद शेख आदींच्या पथकाने औषध निरीक्षक राहुल करंडे यांच्यासह मिरज शहरातील आंबेडकर उद्यानाच्या मागे संशयितरित्या वावरत असलेल्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे अवैध औषधाचे इंजेक्शन आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीविना करता येत नसल्याचे औषध निरीक्षक करंडे यांनी निदर्शनास आणून दिले.
या वेळी औषधांची देवाणघेवाण करण्यासाठी आलेल्या रोहित अशोक कागवाडे (वय ४४, रा. शामरावनगर, आकांशा मेडिकलवरील बाजूस) आणि ओंकार रवींद्र मुळे (वय २४) या दोघांची कसून चौकशी केली असता पुरवठादार आशपाक बशीर पटवेगार (वय ५०, रा. असुबा हॉटेलसमोर) यांचे नाव समोर आले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत पटवेगार यांच्या घरी छापा टाकला असता घरात नशेच्या १५०७ इंजेक्शनच्या बाटल्या, १७६ विविध प्रकारच्या नशेसाठीच्या औषधी गोळ्यांचा साठा सापडला. तसेच दारासमोर असलेल्या मोटारीची झडती घेतली असता त्यामध्येही नशेच्या इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या.
आणखी वाचा-सोलापूर : बार्शी-येडशीत वाघाला जेरबंद करण्यासाठी आता पुण्याचे पथक
पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून मेफेंटमाइन इंजेक्शनच्या १५०७ बाटल्या आणि १७६ नशेसाठीच्या औषधी गोळ्या असा ६ लाख १६ हजारांचा साठा आणि ८ लाख ३० हजारांची चारचाकी मोटार व दुचाकी असा १४ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या औषधाची मूळ किंमत कमी असून, नशेसाठी एक इंजेक्शनची बाटली ८०० रुपयांना विकण्यात येत असल्याची माहिती चौकशीत समजली आहे. या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.