साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासातील उघडय़ा खोलीतून अज्ञात चोरटय़ाने साडेसात लाख रुपये किमतीचे २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. ही घटना आज सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली आहे.
भीमा नाईक स्वामी नाईक (वय ३९, रा. कर्नाटक) हे साईभक्त आपल्या कुटुंबीयांसमवेत बुधवारी रात्री शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासात दोन खोल्या घेतल्या होत्या. नाईक यांच्या कुटुंबीयांनी सर्व सोन्याचे दागिने एका छोटय़ा बॅगमध्ये काढून ठेवले होते. सकाळी नाईक यांची पत्नी खोलीचा दरवाजा उघडून जवळच्याच दुकानात गेल्या असता, दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरटय़ांनी सोन्याचा ऐवज ठेवलेली बॅग लंपास केली. या बॅगेत तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने होते. साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचे नाईक यांच्या झोपेतून उठल्यानंतर लक्षात आले. नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासात वारंवार चोरीच्या घटना वाढत असल्याने साईभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थानच्या भक्तनिवासात सुरक्षाव्यवस्था असूनही चोरीच्या घटना होत असल्याने संस्थानच्या सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यास शिर्डी पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे.

Story img Loader