महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर अहमदनगरमध्ये मंगळवारी झालेल्या दगडफेकीचे पडसाद विदर्भात मनसे-राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या काही भागात उमटले. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, कळमेश्वर, हिंगणा आणि नागपूर शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध करीत पोस्टर फाडून जाळले. शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा निषेध करीत होळी केली. त्यामुळे वातावरण तणावाचे आहे. नागपुरात मनसे-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. बसेसवर मोठय़ा प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याने नुकसान झाले. मात्र, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे कुठेही आणखी अनुचित वळण मिळाले नाही.
अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या कार्यालयात पहाटेच्या सुमारास मनसेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने उभी असलेली अ‍ॅम्बुलन्स फोडण्याचा प्रयत्न झाला. प्रत्युत्तरादाखल मनसे कार्यालयावर हल्ल्याची शक्यता पाहता मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात वणी व मारेगाव मार्गावर मनसे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले. बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखलीतील मनसेचे पदाधिकारी व सैनिक रस्त्यावर आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रतिकात्मक कागदी पुतळा रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. चिखली-बुलढाणा रस्त्यावर माहूरगड जळगांव या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. नागपुरातील नंदनवन परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत दोन स्टार बसेसच्या काचा फोडून संताप व्यक्त केला.  विदर्भातील राष्ट्रवादी आणि मनसे नेत्यांचीही आता पत्रकबाजी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. मनसेच्या आक्रमकतेला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादीची असल्याचा नागपूरचे जिल्हाध्यक्ष अजय पाटील यांनी दिल्यानंतर तणावात आणखी भर पडली असून मनसेची त्याला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे मनसेचे विदर्भ संघटक हेमंत गडकरी यांनी म्हटले आहे. विदर्भाच्या अन्य जिल्ह्य़ातही स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांचे नेतृत्त्व आता रस्त्यावर उतरले आहे.

Story img Loader