शिलशेत ओहोळवरील दगडी पूल निधीअभावी दुरुस्तीसाठी रखडला
पालघर : केव-म्हसरोली गावाच्या शिलशेत ओहळावरील वाहतुकीसाठी असलेला पूल धोकादायक झाला आहे. दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असूनसुद्धा निधीअभावी पूल दुरुस्तीपासून रखडला आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल सातत्याने तक्रारी केल्या जात असून पूल दुर्घटनेत एखाद्याचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाहून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर हे म्हसरोली गाव वसले आहे. या गावातील ग्रामस्थांना मनोर विक्रमगड रस्त्यावरून केव फाटामार्गे केव म्हसरोली रस्त्याने जावे लागते. हाच रस्ता पुढे कुर्झे कडी पाडामार्गे वाडा तालुक्यात जातो. असे असले तरी म्हसरोली गावातील ग्रामस्थ सोयीचा रस्ता म्हणून कुर्झे मार्गाचा वापर मोठय़ा प्रमाणात करतात. या गावाच्या शेवटी शिलशेत ओहळावर दगडी बांधकाम असलेला जुना पूल आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे त्याच्या स्तंभाचे दगड निखळून पडले आहेत. पुलाला भगदाडे पडली आहेत. या पुलाच्या जीर्णावस्थेत गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना मालाची ने-आण करण्यासाठी शिलशेत ओहोळवरील पूल तसेच केव म्हसरोली रस्त्याच्या सुरुवातीला असलेल्या पुलाचाच वापर करावा लागतो. पावसाळ्यात हे दोन्ही पूल पाण्याखाली जात असल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडते. त्यात म्हसरोली कुर्झे रस्त्यावरील जीर्ण झालेला पूल पावसात वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसे झाल्यास गावाचा इतर गावांशी संपर्क तुटेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
पावसाळ्याआधी पूल दुरुस्तीची मागणी
ग्रामसडक योजनेतून केव म्हसरोली या आठ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात तांत्रिक बाबींचा विचार करता या पुलाचा रस्त्यात समावेश केलेला नाही. नव्याने बांधण्यासाठी तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव द्यावा लागेल. त्यानंतरच सर्व त्या बाबींची तपासणी करून हा पूल नव्याने बांधकाम करण्यास परवानगी मिळेल असे कळते. मात्र पावसाळा जवळ आला असून या पुलाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन आता असलेल्या पुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून पावसाळ्याआधी पुलाच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, म्हसरोली येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले आहे.
पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनाच्या ३०५४ लेखशीर्षअंतर्गत शक्य तितक्या लवकर पुलाची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देणार आहे. नवीन पुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येईल.
– धनंजय जाधव, उपअभियंता, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, विक्रमगड