लोकसत्ता प्रतिनिधी

नगरः शेवगाव शहरात (जि. नगर) छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त काल, रविवारी रात्री निघालेल्या मिरवणुकी दरम्यान दोन समाजात आक्षेपार्ह घोषणांचे निमित्त होऊन जोरदार दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. अनेक दुकानांचे नुकसान करण्यात आले. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला नियंत्रित केले. दगडफेकीत ३ पोलीस, गृहरक्षक दलाचे ४ जवान जखमी झाले. इतर नागरिकही जखमी झाले आहेत. त्यांची नेमकी संख्या किती याची माहिती पोलीस संकलीत करत आहेत. मात्र चापडगाव (ता. शेवगाव) येथील पातकळ नावाचा युवक (पूर्ण नाव नाही) तलवारीने वार झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय-धार्मिक तणावाच्या वाढत्या घटना घडत आहेत. श्रीरामपुर, राहुरी नगर शहर, नगर तालुका यानंतर आता शेवगावमध्ये दगडफेक व जाळपोळीची घटना घडली आहे.

आणखी वाचा- Akola Dangal : महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही संस्था…”

दरम्यान शेवगावमधील घटनेसंदर्भात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू केले असून आज, सोमवारी दुपारपर्यंत ३२ संशयीत दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आज दुपारी दंगलग्रस्त भागाला भेट देत असून अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत बैठकही घेणार आहेत. घटनास्थळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके काल रात्रीपासून तळ ठोकून आहेत. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे, शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

दगडफेकीत ३ पोलिस व ४ गृहरक्षक दलाचे जवान जखमी झाल्याची तसेच ३२ संशयीत दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मिटके यांनी दिली. जाळपोळीत एक गॅरेज व एक हॉटेल भस्मसात झाले. दुकानांचे व रस्त्यावर उभ्था असलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-Photos : इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्ट, राडा आणि…, अकोल्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर घटनाक्रम

रविवारची रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सायंकाळी शेवगाव शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात तसेच एका समाजाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. प्रार्थनास्थळाच्या बाजूस उभ्या असलेल्या दुसऱ्या समाजाच्या जमावाने त्याला प्रत्युत्तर दिले. त्यातून दगडफेक सुरू झाली. जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली तसेच बंद असलेल्या दुकानांच्या दर्शनी भागाचीही तोडफोड केली. आखेगाव रस्त्यावरील मोटर गॅरेज व एका हॉटेलला जमावाने आग लावल्याने दोन्ही आगीत भस्मसात झाले.

दरम्यान या संदर्भात जखमी किंवा नुकसान झालेल्या इतर कोणीही फिर्यादी.दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार महेश लक्ष्मण सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही बाजूच्या सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १०० जणांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत. या सर्वांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणणे, शस्त्र प्रतिबंध कायदा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- “आर्यन खानप्रकरणात २५ कोटी उकळण्याचा डाव”, समीर वानखेडेंच्या एफआयआरमध्ये सीबीआयचा मोठा खुलासा

नदीम जाफर शेख, समशोद्दीन कादिर सय्यद, रज्जाक कादिर सय्यद, हुसैन रहीम बेग, बाबासाहेब दादू वाघमारे, इमान मुस्तफा पठाण, मतीन युसुफ शेख, व्यासिर इस्माईल शेख, शब्बीर युसुफ जहागीरदार, अर्शद मोहम्मद शेख, मुस्तफा मन्सूर खान पठाण, इम्तियाज इस्माईल शेख, आशुतोष दत्तात्रय डहाळे, आदेश शिवाजीराव फडके, सागर शशिकांत फडके, अनिल शिवराम धनवडे, गणेश गोरख रांधवणे, अरविंद राधेश्याम धूत, ज्ञानेश्वर काकासाहेब कुसळकर, तुषार सुखदेव बुटे, बाळासाहेब बाबुराव गाडे, योगेश सुभाष जाधव, मिलिंद कुसळकर, बाळा वाघ, आकाश चिमण्या, रोहित सुपारे, संतोष जाधव, कैलास तिजोरे, विशाल शिवाजी शेलार, किसन जगन्नाथ चव्हाण, संजय भगवान नागरे आदी प्रमुख आरोपींचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader