जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह अनेकजण जखमी झाले. त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ते चार ठिकाणी दगडफेक झाली आणि बस फोडण्यात आल्या. तसेच संभाजीनगर आगारात एक बस जाळण्याचाही प्रयत्न झाला.
संभाजीनगर आगारात कोल्हापूर आगाराची बस पार्किंगमध्ये उभी होती. बसला आग लागल्याचं लक्षात येताच आगार कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आग नियंत्रणात आल्याने बस पूर्ण जळण्यापासून वाचवण्यात आली. असं असलं तरी ही आग कुणी लावली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरू केला आहे.
व्हिडीओ पाहा :
शेकटा फाटा येथे मराठा आंदोलकांनी टायर पेटवत निषेध
याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या बिडकिन येथील शेकटा येथे मराठा आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन टायर पेटवून निषेध करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. बिडकिन आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
जालना प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे जालना प्रकरणावर म्हणाले, “जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वत:हा उपोषकर्त्याबरोबर चर्चा केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. अशा प्रकारची घटना होणं, योग्य नाही. एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं, ‘मनोज जरांगे-पाटीलची तब्येत खालावत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती.’ पण, ही दुर्दैवी घटना घडली आहे.”
हेही वाचा : जालन्यात मराठा आक्रोश मोर्च्यावर लाठीचार्ज, फडणवीसांचं नाव घेत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी,” असं एकनाथ शिंदेंनी आवाहन केलं.