उस्मानाबादमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. मंगळवारी (१९ ऑक्टोबर) रात्री १० च्या सुमारास शहरातील विजय चौक येथे ही घटना घडली. या दगडफेकीत विजय चौक येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, शहर पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत, तहसिलदार गणेश माळी यांनी घटनास्थळी पोहचून तातडीने कारवाई केली. मुघल राजा औरंगजेबाविषयीच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर हा वाद उफाळला आहे.

” दोन्ही गटातील कायदा हातात घेणाऱ्यांवर कार्यवाही करणार”

प्रशासनाने बंदोबस्त लावत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलीस प्रशासन दोन्ही गटातील कायदा हातात घेणाऱ्यांवर कार्यवाही करत आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले आहे.

“हुल्लडबाजी करून, दगडफेक करत कायदा हातात घेतला”

शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत म्हणाले, “ही घटना फार विशेष नव्हती दोन तरुणांनी फेसबूकवर एक प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या गटाने या प्रतिक्रियेमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या फेसबुक प्रतिक्रियेवरून तक्रार आल्यानंतर आम्ही त्यावर कारवाई करणार आहे. मात्र, पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना शांत राहणं गरजेचं होतं. विनाकारण चौकात येऊन हुल्लडबाजी करून, दगडफेक करून कायदा हातात घेतला आहे.”

“अफवांवर विश्वास ठेऊ नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन”

“मी विजय चौकातील दोन्ही गटातील नागरिकांना आवाहन करतो की अफवांवर विश्वास ठेऊ नका. पोलीस पोलिसांचं काम करतील. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. फेसबुकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देऊन वाद तयार करणारे आणि दगडफेक घेऊन कायदा हातात घेणाऱ्या दोन्हींवर कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : रस्त्याच्या वादातून दगडफेकीनंतर बोपखेलमध्ये तणाव, महिला, मुलांसह पोलीसही जखमी

“नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं. ज्यांना या घटनेविषयी माहिती असेल त्यांनी आम्हाला गुप्तपणे ही माहिती द्यावी. या माहितीचं आम्ही स्वागत करू,” असं आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केलं.

व्हिडीओ पाहा :