विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर सोमवारी भगवानगडावरील जमावाने दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमुळे धनंजय मुंडे यांना कोणतीही दुखापत झालेली नसून, ते सुखरूप आहेत. दगडफेक करण्याचा कट पूर्वनियोजित होता, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.
भगवानगडावरील कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे सोमवारी सकाळी तिथे पोहोचले. त्यांच्या गाड्यांचा ताफा गडावर आल्यावर जमावाने त्यांच्या गाड्यांच्या दिशेने दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर गडावरील वातावरण तणावपूर्ण बनले. दगडफेकीच्या प्रयत्नानंतर धनंजय मुंडे यांनी गडाचे प्रमुख नामदेवशास्त्री महाराज यांची भेट घेतली. त्याचबरोबर समाधी मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. नामदेवशास्त्री महाराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही वेळाने ते गडावरून खाली परतले.
भगवानगडावर जाईपर्यंत सर्व ठिकाणी आपले स्वागत करण्यात आले. मात्र, काही जणांनी पूर्वनियोजित कट रचून गडावर आपल्या गाड्यांच्या दिशेने दगडफेकीचा प्रयत्न केल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. समाधी सोहळ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी भगवानगडावर कार्यक्रम होणार असून, त्यासाठी राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ तिथे येणार आहे. मात्र, या सोहळ्याचे निमंत्रण आपल्याला देण्यात आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. पण आपल्याला मुद्दामहून निमंत्रण देण्यात आलेले नाही. गडावर येण्यापासून रोखण्यासाठीच हा डाव रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Story img Loader