फेसबुकवरील एका आक्षेपार्ह छायाचित्राच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या जमावाने गुरुवारी भिवंडीमध्ये अक्षरश धुडगूस घातला. धार्मिक भावना दुखावल्याने हिंसक बनलेल्या या जमावाने तीन पोलीस ठाण्यांना घेराव घातला, तसेच वंजारपट्टी येथे पोलिसांवर जबरदस्त दगडफेक केली. त्यात साहाय्यक पोलीस आयुक्तांसह २० पोलीस गंभीर जखमी झाले. या जमावाने मुंबई-नाशिक महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला, तसेच शहरात अनेक वाहनांची तोडफोड केली. वंजारपट्टी नाका आणि फिरदौस मशीद येथे हिंसाचार करीत असलेल्या या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरील एका छायाचित्रातून प्रार्थनास्थळाची विटंबना करण्यात आल्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी संतप्त नागरिकांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील टोल नाका बंद पाडून तीन तास ‘रास्ता रोको’ केला.
तसेच वाहनांची तोडफोड केली. भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसर बंद ठेवण्यात आला, तसेच शालांत परीक्षाही रद्द करण्यात आल्या. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या प्रकरणी निजामपुरा पोलिसांनी २०० जणांवर गुन्हे दाखल केले असून मोहम्मद अन्वर, असीम शहा, गुलाब मोमीन, कफील अन्सारी आणि सलीम शेख यांना अटक करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा