जनावरे घेऊन जाणारा टेम्पो अडवल्याने वाद चिघळून झालेल्या दोन गटांतील दगडफेक व धुमश्चक्री प्रकरणी उंब्रज (ता. कराड) पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी संशयितांची धरपकड केली असून, या घटनेत फिरोज सौदागर (३२, रा. सदर बझार सातारा) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तलवार, लाठय़ाकाठय़ा, दगडांचा वापर झाल्याचे दाखल तक्रारीत नमूद आहे.
काल रविवारी (दि. ८) सायंकाळी उंब्रज पोलीस ठाण्याच्या परिसरातच दोन गटांत तुफान दगडफेक झाली. पाळीव जनावरे घेऊन जाणारा टेम्पो (एमएच ११ टी. १२२५) काही तरुणांनी कळंत्रेवाडी गावानजीक अडवला. टेम्पो घेऊन ते उंब्रज पोलीस ठाण्यात आले. हे तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्ते असल्याचे समजते.
या दरम्यान टेम्पो चालकाने भ्रमणध्वनीवरून हा प्रकार आपल्या मित्रमंडळींना कळवला. काही वेळातच दोन्ही बाजूंकडील लोक पोलीस ठाण्याच्या परिसरात जमले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने वाद होऊन त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. पोलीसही हतबल झाल्याने १५-२० मिनिटे दगडफेक सुरूच राहिली. त्यात एका मोटारीचेही नुकसान झाले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जादा कुमक वाढवताना, उंब्रज व कराड येथे बंदोबस्तात वाढ केली. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपअधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी उचित सूचना केल्या. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना, या प्रकरणी दोषींवर सक्त कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
रशीद खुदबुद्दीन आतार (३९, रा. रामापूर, पाटण) यांच्या फिर्यादीवरून दाखल तक्रारीतील १५ पैकी ११ जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या फिर्यादीत अन्य १५ ते २० अनोळखी इसमांचाही आपल्यावरील हल्ल्यात समावेश असल्याचे म्हटले आहे. तर राजेंद्र लक्ष्मण कुराडे (३२, रा. उंब्रज, ता. कराड) यांच्या फिर्यादीवरून १५ पैकी ९ जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. कुराडे यांच्या फिर्यादीत इतर १० ते १५ अनोळखी इसमांचा समावेश आहे. दोन्ही बाजूच्या अन्य संशयितांचा शोध जारी असून, सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
उंब्रजमध्ये दोन गटांत दगडफेक; एक जखमी, २० जणांना कोठडी
जनावरे घेऊन जाणारा टेम्पो अडवल्याने वाद चिघळून झालेल्या दोन गटांतील दगडफेक व धुमश्चक्री प्रकरणी उंब्रज (ता. कराड) पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

First published on: 10-03-2015 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stones in the two groups in umbrajone injured custody to 20 persons