सोलापूर : मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्याचा प्रकार दुस-यांदा घडला आहे. सुदैवाने यात प्रवाशांना दुखापत झाली नाही. मुंबईहून सोलापूरकडे येणा-या वंदे भारत एक्सप्रेसवर दौंड ते कुर्डूवाडीदरम्यान जेऊरजवळ जिंती रोड येथे रात्री अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. ही दगडफेक किरकोळ स्वरूपाची असली तरी त्यात गाडीच्या डबा क्रमांक २ मधील आसन क्रमांक ५० च्या खिडकीला दगडांचा मार बसून तावदाने फुटली.
हेही वाचा >>> इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगरातील मोर्चावर शिंदे गटाची टीका; म्हणाले, “हे निजामवाले…”
सुदैवाने यात एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी २४ एप्रिल रोजी याच वंदे भारत एक्सप्रेसवर पुण्याजवळ हडपसर-लोणी दरम्यान अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. त्यात चार डब्यांच्या खिडक्यांची तावादाने फुटली होती. १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारांभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून केला होता. परंतु या अत्याधुनिक सुविधांसह धावणा-या गाडीवर दगडफेकीचे प्रकार पुनःपुन्हा घडत असल्यामुळे रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.