विधानपरिषेदतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सोमवारी पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांना धक्काबुक्की करीत या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेकही केली. धनंजय मुंडे यांना यात इजा झाली नाही, मात्र भगवानगडावरील सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमास त्यामुळे गालबोट लागले.
सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार झाला. भगवानगडावर उद्या (मंगळवार) मुख्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
धनंजय मुंडे सोमवारीच येथे भगवानबाबांची समाधी व गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्या दर्शनासाठी आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. येथे दर्शन घेऊन ते नामदेवशास्त्री यांच्या गडावरील निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा करीत असताना बाहेर मोठा जमाव जमला होता. हे कार्यकर्ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्या समर्थनाच्या घोषणा देत होत्या. नामदेवशास्त्री यांनी या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र धनंजय मुंडे बाहेर येताच या घोषणा व कार्यकर्त्यांचा आक्रमकपणाही वाढला. नामदेवशास्त्री यांनी त्यांना गडाच्या मागील बाजूने जाण्याचा सल्ला देऊन त्यांना गाडीत बसवून रवाना केले. मात्र गाडीचा पाठलाग करून गाडीवर दगडफेक केली.
अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा
याबाबत धनंजय मुंडे हेच पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणार अशी चर्चा होती. मात्र या प्रकारानंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमाला निघून गेले. रात्री उशिरा सहायक फौजदार दयानंद सोनवणे यांनीच पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक
विधानपरिषेदतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सोमवारी पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांना धक्काबुक्की करीत या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेकही केली.
First published on: 06-01-2015 at 04:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stoning on dhananjay mundes car