अतिदुर्मीळ माळढोक पक्ष्याचे चंद्रपूरच्या वरोरा भागातील अस्तित्व निवासी बांधकामांमुळे धोक्यात आले आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्य़ातील नान्नज तसेच विदर्भातील वरोरा, उमरेड आणि भद्रावती येथे माळढोक पक्षी आढळले आहेत. कृषी जमिनींचे अकृषक भूखंडात रूपांतरण करून निवासी बांधकामांसाठी संपादन केले जात असल्याने त्यांचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
भारतात वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अन्वये माळढोक पक्ष्याला सूची १ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाने गेल्या वर्षीपासून माळढोक, बंगाली तणमोर आणि तणमोर या माळरानावर अधिवास करणाऱ्या तिन्ही पक्षी प्रजातींना संरक्षण देण्यासाठी विशेष संवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे. वरोरा आणि नजीकच्या परिसरात सात माळढोक पक्ष्यांचा अधिवास असल्याचे पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकसत्ता’ला  सांगितले.
राज्यव्यापी सर्वेक्षणात २००५ साली सहा माळढोक वरोऱ्याजवळ आढळले होते. परंतु, गेल्या वर्षी फक्त तीनच पक्षी दिसल्याने उर्वरित तीन पक्ष्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन पक्ष्यांनी उमरेड परिसरात घरटी बांधली होती. यानंतर विदर्भात कुठेही माळढोक दिसलेला नाही. वरोऱ्याजवळ मोठय़ा प्रमाणात घरांचे बांधकाम सुरू आहे. कोळसा खाणींची संख्यादेखील मोठी आहे. या पक्ष्याच्या संचारमार्गाविषयी संबंधित यंत्रणा बेफिकीर असल्याने उरलेसुरले माळढोक नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे.
वरोऱ्यातील मारडा जवळील जमिनीवर मोठय़ा प्रमाणात अकृषक जमिनींना परवानगी देण्यात आली असून, विकासाचे काम जोरात सुरू आहे. माळढोक पक्षी विशेषत: माळराने किंवा शेती असलेल्या भागातच वास्तव्य करतो. शेतजमिनींचे प्लॉट पाडून वसाहती निर्माण केल्या जात असल्याने वरोऱ्यात दिसणाऱ्या माळढोकच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. विकास कामांसाठी बुलडोझर आणि मशिनींचा वापर केला जात असल्याने हा पक्षी या भागात दिसेनासा होईल, असा इशारा ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ गोपाळ ठोसर यांनी दिला. गोपाळ ठोसर यांनी ३० वर्षे उमरेड, भद्रावती आणि वरोऱ्यातील माळढोकचा अभ्यास केला आहे.
माळढोकची घरटी असलेल्या भागापासून वरध ऊर्जा प्रकल्प आणि लँको ऊर्जा प्रकल्प अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही ऊर्जा प्रकल्पांमधील कचरासामग्री टाकण्यासाठी नजीकच्या कृषी जमिनी संपादन करण्यात येत आहेत. चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) संजय ठाकरे यांनी गेल्या रविवारी मारडा-मांढळ मार्गाचे सर्वेक्षण केले. त्यांनीही माळढोकची घरटी असलेल्या भागात बांधकामे सुरू असल्याचे मान्य केले. उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या भागातील जमिनींना देण्यात आलेला अकृषक दर्जा रद्द केल्यास माळढोकचे संवर्धन शक्य असल्याचे विभागीय वन अधिकारी एन. डी. चौधरी आणि चंद्रपूरचे मानद वनरक्षक बंडू धोत्रे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटती संख्या चिंताजनक
वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला गुजरात सरकारने उपग्रह देखरेखीसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. इंटनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने २०११ साली माळढोक पक्षी प्रजातीला अतिदुर्मीळ घोषित केले असून, भारतात २५० माळढोक शिल्लक असल्याचा इशारा दिला आहे. २००८ साली हीच संख्या ३०० होती.

घटती संख्या चिंताजनक
वाइल्डलाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला गुजरात सरकारने उपग्रह देखरेखीसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. इंटनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने २०११ साली माळढोक पक्षी प्रजातीला अतिदुर्मीळ घोषित केले असून, भारतात २५० माळढोक शिल्लक असल्याचा इशारा दिला आहे. २००८ साली हीच संख्या ३०० होती.