सांगली : अंगाची लाहीलाही करणाऱ्या तीव्र उकाड्यानंतर तासगाव, वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळी दमदार हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटीसह झालेल्या पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष हंगामावर संकट उभे ठाकले आहे.
आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. यामुळे तपमान ३६अंश सेल्सियस असताना ३७ अंश भासत होते. हवेतील आद्रता ४० टक्के असताना सायंकाळी ढगांची आकाशात गर्दी होऊन पूर्वेकडील वाऱ्यासोबत पावसाचे आगमन झाले.
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटीसह पाऊस झाला, तर खानापूर तालुक्यातील काही भागांत पाऊस झाला. वाळवा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाची सरी बरसल्या.
आज दिवसभर उन्हाचा चांगला कडाका बसत होता. उकाडा तीव्रतेने जाणवत होता. वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात आज सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी पडल्याने ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर दुसरीकडे या परिसरामध्ये गहू, हरभरा, शाळू याची मळणी चालू आहे. यामुळे शेतकरी वर्गाची या अवकाळी पावसामुळे एकच धांदल उडाली. तर वादळी वाऱ्यामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, काही बागांमध्ये तयार द्राक्षे आहेत. मणेराजुरी परिसरात गारपीट झाल्याने तयार मालातील मणी तडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाढत्या उन्हामुळे शुकशुकाट
सांगलीत गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानाबरोबरच उन्हाची तीव्रता अधिक जाणवल्याने दुपारी बारानंतर रस्त्यावरील वर्दळ अत्यल्प झाल्याने अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून दिवसाचे कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सियसपर्यंत होते. मात्र, हवेत दमटपणा असल्याने तापमान ३९ अंश सेल्सियस असल्याचे भासत होते. सूर्योदयानंतर लगेचच त्यामध्ये वाढ होते. दुपारनंतर डांबरी रस्ते, सिमेंटच्या इमारती तापल्यानंतर हेच तापमान सायंकाळी चार वाजता सर्वोच्च पातळीवर ३८ अंशापर्यंत पोहचते. वाढत्या उन्हाच्या झळामुळे आणि रस्ते तापल्यामुळे वाहनधारकांनी रस्त्यावर येणेच टाळत आहेत. वाहनधारकांची वर्दळ अल्प असल्याने रस्ते ओस पडले होते. तर ग्राहकच नसल्याने बाजारातील दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवून विश्रांती घेण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र सांगलीतील गणपती पेठेत दिसून आले. वाढत्या उकाड्यातून दिलासा मिळावा यासाठी शीतपेय गाड्यांवर लोकांची गर्दी दिसून येत होती.