एजाजहुसेन मुजावर, सोलापूर
क्षुल्लक कारणांवरून सतत त्रास देऊन पतीने हाकलून दिल्यानंतर ‘पराया धन’ किती दिवस सांभाळायचे म्हणून माहेरच्या मंडळींचाही त्रास सुरू झालेला. त्यातच मानसिक संतुलन ढळल्याने ‘तिने’ घराचा उंबरठा ओलांडला. घराबाहेर पडल्यानंतर इकडेतिकडे भटकताना तिच्यावर गिधाडांची नजर पडली. या गिधाडांच्या तडाख्यात सापडल्यानंतर व्हायचे तेच झाले. पोटात गर्भ वाढला आणि ती रस्त्यावरच प्रसूत झाली. बेवारस अवस्थेत तिला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयाचा आधार मिळाला. मनोरुग्ण बनलेल्या तिला आपण कोण आहोत, हेच सांगता येत नव्हते. रुग्णालयातील माणुसकीचे हात राबले आणि शेवटी तिला पुनर्जन्मच मिळाला. हरवलेले माहेर पुन्हा लाभले.
गुजरातच्या दावोद जिल्हय़ात राहणाऱ्या एका अभागी तरुणीची ही चित्तरकथा. ७ सप्टेंबर २०१८ रोजी कुणा अज्ञात व्यक्तीने ती बाळंतिण असताना बेवारस स्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयाच्या खुल्या आवारात आणून टाकले. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. रुग्ण बाळंतीण महिला पूर्णत: मनोरुग्ण होती. तिला बोलताही येत नव्हते. ती जेवणही करीत नव्हती. त्यामुळे तिच्या नवजात बाळाच्या पालनपोषण व संरक्षणासाठी बालकल्याण समितीच्या मान्यतेने ‘पाखर संकुल’ संस्थेत दाखल करण्यात आले. पुढे आठ दिवसांनंतर रुग्णालयात ती काहीशी पुटपुटू लागली. ‘खबर न थी’एवढेच वाक्य ती अधूनमधून उच्चारायची. योगायोगाने रुग्णालयात गुजराती भाषा अवगत असलेल्या डॉ. हुमा कुरेशी यांनी प्रेमाने व विश्वासाने तिच्याशी संवाद साधला. तेव्हा ‘वाकोट’ हे नाव सांगत होती. त्यावरून गुगलवर गुजरात वाकोट हे शब्द संशोधन केले असता काही माहिती पुढे आली. गुजरातच्या दावोद जिल्हय़ात धनपूर पोलिसांशी संपर्क साधून ‘व्हॉट्सअॅप’वर रुग्णाचे छायाचित्र पाठवले. रुग्णावर सोलापुरात वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती कळविण्यात आली असता रुग्णाची ओळख पटणारी माहिती समोर आली. धनपूर पोलीस ठाण्यात या रुग्ण महिलेच्या हरवल्याची नोंद होती.
दरम्यान,तिचा चुलता गुजरातमधून सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात आला. त्याने तिची ओळख पटविली. दोन दिवस थांबून तो निघून गेला. पुन्हा आलाच नाही. तेव्हा प्रयत्न करूनही नातेवाईक येत नसल्याने शेवटी तिच्या कायदेशीर पुनर्वसनाचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला गेला. अखेर बालकल्याण समितीच्या सदस्या सुवर्णा बुंदाले यांनी केलेल्या प्रयत्नानंतर तिला रेणुकामाता शासकीय महिला आश्रमात पाठविण्यात आले. तेथे ती आठ दिवस राहिली. दरम्यान, गुजरात पोलिसांनी रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णाचे भाऊ येऊन तिचा ताबा घेणार असल्याचे कळवले. त्यानुसार तिचा भाऊ आला आणि त्याने कायदेशीर प्रक्रियेअंती आपल्या बहिणीचा ताबा घेतला. छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक संतोष कांबळे यांच्यासह कपिल गायकवाड, अनिल ठाकरे, नरेंद्र भालेराव आदींचा निरोप घेताना रमतू हिला अक्षरश: भरून आले होते.