पालकांचे छत्र हरपलेल्या मुलाची चित्तरकथा; अपंग-गतिमंद बहिणीचाही सांभाळ
वय १३ वर्षे. आईवडील नाहीत. त्यांच्यानंतर सांभाळ करणाऱ्या मावशीचेही नुकतेच निधन झालेले. अशा निराधार स्थितीत अपंग-गतिमंद असलेल्या बहिणीची जबाबदारी सांभाळत त्याची जगण्याची लढाई सुरू आहे. परिस्थितीपुढे हार न मानता शिक्षणासाठी पाच किलोमीटरची तंगडतोड करत त्याचा संघर्ष सुरू आहे.
ही संघर्ष कथा आहे, मिरज तालुक्यातील आरग लिंगनूर मार्गावरील रामनगर या छोटेखानी वस्तीवर चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या सूरज नाईक या मुलाची. आठवीत शिकणाऱ्या सूरजच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचेही दोन वर्षांत निधन झाले. आईबापाविना पोरक्या झालेल्या दोघा बहीणभावांचा सांभाळ करण्यासाठी मावशी धावून आली, पण तिचाही चार महिन्यांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला.
आई, वडील आणि आता मावशी या तिघांचाही मृत्यू झाल्याने तेरा वर्षांचा सूरज संपूर्णत: निराधार झाला आहे. स्वत:बरोबरच अपंग आणि गतिमंद असलेल्या १५ वर्षांची बहीण पूजाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली आहे. ज्या वयात शाळेत जायचे, खेळायचे त्याच वयात त्याच्यावर हा डोंगर कोसळला आहे. घर चालवायचे, सांभाळायचे, बहिणीचा आधार व्हायचे आणि हे करता करता स्वत:चे शिक्षणही सुरू ठेवायचे.. अशी या चिमुरडय़ाची संघर्षयात्रा सुरू आहे.
सूरजची बहीण कमरेपासून खाली अपंग असून तिला स्वतचे विधीही करता येत नाहीत. रोज सकाळी बहिणीचे आणि स्वत:चे आवरत सूरजचा दिवस सुरू होतो. मग चार काटक्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक रांधायचा आणि बहिणीचे ताट तिच्यापुढे वाढून शाळेत निघायचे. त्यासाठी पुन्हा ५ किलोमीटरची तंगडतोड. शाळेतून आल्यावर पुन्हा हा सारा गाडा हाकायचा.
एवढय़ा लहान वयात त्याच्यावर कोसळलेले हे संकट आणि त्याचा सुरू असलेला संघर्ष पाहून येथील गांधी रुग्णालयातील डॉ. दिनेशॉ, डॉ. दीप्ती पाटील यांनी त्याला लागणारा शिधा, सामानाची तजवीज केली. त्याच्या शाळेतील एका शिक्षकाने त्याला जुनी सायकल दिली. यातून त्याच्या दु:खाचा भार काही प्रमाणात हलका झाला, पण संपलेला नाही. रोजच्या जगण्याचा, बहिणीला जगवण्याचा संघर्ष त्याला आजही करावा लागत आहे आणि हा संघर्ष करता करताही शिक्षण चालू ठेवण्याची त्याची धडपड सुरू आहे.