राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांच्छनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहीत असून, सरन्यायाधीशांना ट्रोल करण्याची हिंमत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा किती सत्तापिपासू आहे, याचा अंतच नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडताना सुरतेपासून गुवाहाटीपर्यंत काय – काय झाले, राज्यपालांनी पदाचा कसा दुरुपयोग केला, या सर्व घटना आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी जे काही प्रश्न विचारले, निरीक्षणे नोंदवली यावर त्यांना ट्रोल केले गेले, हा ट्रोल करण्याचा प्रकार गंभीर आहे. केंद्रातील सरकारवर कोणाचाच विश्वासच राहिलेला नाही म्हणूनच राष्ट्रपतींकडे दाद मागण्यासाठी काँग्रेस खासदार गेले आहेत.
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल, यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु मंत्रालयात लगबग सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी चाहुल लागली आहे, असे वाटते. साधारणतः सरकारचा कालावधी संपताना किंवा सरकार जाऊ शकते, अशी वेळ येते त्यावेळी अशी लगबग सुरू असते. आम्ही सर्वोच्च न्यायलयातील निकालाची वाट पैहात आहोत, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
संतांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही – पटोले
धीरेंद्र शास्त्री या बाबाचा मीरा रोड येथे कार्यक्रम होत आहे, त्यांनी काय प्रवचन करावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु या व्यक्तीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अपमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही? असा आमचा सवाल आहे. आम्हाला आमचे संत महत्त्वाचे आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. संतांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची सुरुवातही संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानेच केली. संतांच्या विचारात मोठी ताकद आहे. भ्रष्ट विचाराचे कोणी स्वतःलाच संत म्हणून घेत असेल तर ते बरोबर नाही. आमच्यासाठी संत तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ आहेत. महाराष्ट्रात येऊन जर संत तुकाराम महाराज यांचा कोणी अपमान करत असेल तर ते अजिबात चालणार नाही. संतांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.